आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींचा मंत्र : जिथे शेती तिथे प्रयोगशाळा; काय आहे, पंतप्रधानांची \'नीलक्रांती\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कृषी उत्पादन वाढवण्यासाठी या क्षेत्रातील संशोधनाचा जास्तीत जास्त शेतकर्‍यांना लाभ व्हावा म्हणून ‘शेती तिथे प्रयोगशाळा’ असली पाहिजे, असा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिला. केवळ देशालाच नव्हे, परदेशातही अन्नधान्य पुरवण्याची क्षमता भारतीय शेतकर्‍यांत निर्माण व्हावी, असे आवाहन त्यांनी केले.
भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या 86 व्या स्थापनादिनी आयोजित समारंभात मोदी बोलत होते. शेतकर्‍यांनी भारतासोबत जगभरात अन्नधान्याचा पुरवठा करावा, अशी क्षमता त्यांच्यात आणणे आणि त्यांचा आर्थिक स्तर सुधारणे या दोन्ही बाबींवर लक्ष केंद्रित करण्याची आज गरज आहे, असे त्यांनी नमूद केले. शास्त्रीय तंत्रज्ञानाचा वापर कृषी उत्पादनाच्या वाढीसाठी झाला पाहिजे, कमीत कमी शेतीमध्ये कमी वेळेत अधिकाधिक उत्पादन घेता यावे, या दृष्टीने प्रयत्नांची गरज मोदी यांनी प्रतिपादित केली.

शतकोत्सवाची तयारी करा : 14 वर्षांनंतर कृषी संशोधन परिषदेचा शतकोत्सव साजरा करण्यासाठी शास्त्रज्ञांनी संशोधनात भरघोस यश मिळवावे, असे आवाहनही मोदी यांनी केले.

मोदी म्हणाले...
शास्त्रीयदृष्ट्या आवश्यक घटकांचा विचार करून शेतीवर संशोधन व्हावे.
कृषी महाविद्यालये आणि विद्यापीठांनी रेडिओ केंद्र सुरू करून शेतकर्‍यांत जागरूकता निर्माण करावी.
जोवर शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढणार नाही तोवर कृषी उत्पादनही वाढणे अशक्य. याच दृष्टीने सरकारची धोरणे असायला हवीत.
मच्छीमारांचे जीवन सुधारावे
भारताच्या राष्ट्रीय ध्वजामध्ये तीन रंग आहेत. या आधारे हरित आणि श्वेत क्रांतीबद्दल आपण नेहमी बोलतो. या तिरंग्यातील अशोक चक्र निळ्या रंगात आहे. ती नीलक्रांती आज अपेक्षित आहे. मत्स्यपालन व विकासात ही क्रांती व्हावी आणि जागतिक बाजारपेठ आपण काबीज करावी. यातून मच्छीमारांचे जीवनमानही सुधारेल, असे मोदी म्हणाले.

‘कम जमीन, जादा उपज’
पाणी ही देवाने दिलेली देण आहे. या पाण्याचा एक थेंबही वाया जाऊ नये म्हणून सामान्य लोकांत जागरूकता निर्माण व्हावी, या दिशेने काम करण्याची गरज असल्याचे मोदी यांनी नमूद केले. किंबहुना ‘कम जमीन, कम समय और जादा उपज’ हेच आपले ब्रीदवाक्य असले पाहिजे, असेही पंतप्रधानांनी या वेळी नमूद केले.

खाद्यतेल, डाळींमध्येही स्वयंपूर्ण व्हावे
भारताची अर्थव्यवस्था कृषी आधारित असूनही खाद्यतेल तसेच
डाळींची मागणी पूर्ण करण्यासाठी आपल्याला आयातीवर विसंबून राहावे लागते. या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली.

संशोधन सहज कळावे
शेती आणि कृषी उत्पादनांवर आज देशात प्रचंड प्रमाणात संशोधन सुरू आहे. मात्र, आधुनिक काळाशी निगडित हे संशोधन क्षमता वृद्धीसाठी कसे फायद्याचे आहे ते शेतकर्‍यांना सहज आणि सोप्या भाषेत कळायला हवे. यासाठी शेती तिथे प्रयोगशाळा असणे गरजेचे असल्याचे मोदींनी म्हटले आहे.

डिजिटल डेटाबेसची गरज
आजवर झालेल्या कृषीविषयक संशोधनांचा डिजिटल डेटाबेस येत्या 4-5 वर्षांत तयार करावा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. तरुण आणि उच्चशिक्षित शेतकरी देशातील संशोधकांच्या मदतीने शेतीमध्ये नवे कौशल्य विकसित करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.