आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिपावली मिलन : पत्रकारांच्या प्रश्नांना ठेवले दूर, सेल्फीसाठी उडाली झुंबड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिपावली मिलन कार्यक्रमात जवळपास 900 पत्रकार उपस्थित होते. मात्र पंतप्रधानांनी पत्रकारांच्या एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. शनिवारी भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात दिपावली मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मोदींनी काही मिनीटांचे शुभेच्छापर भाषण केले. शेवटी पत्रकारांमध्ये जाऊन त्यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी मोदींसोबत सेल्फी घेण्यासाठी झुंबड उडाली होती. या कार्यक्रमात फक्त प्रिंट मीडियाच्या कॅमेरांना परवानगी देण्यात आली होती. टीव्ही मीडियाचे कॅमेरे बाहेर ठेवण्यात आले होते. वृत्तवाहिन्यांसाठी फुटेजची व्यवस्था भाजपने केली होती.
काय म्हणाले पंतप्रधान
पंतप्रधान मोदींनी भारतात सणांचे काय महत्त्व आहे ते विषद केले. ते म्हणाले, सण-उत्सव हे समाजाला गती, उत्साह देतात. यांचा सामाजिक आणि आर्थिक अंगाने अभ्यास केल्यास चांगली माहिती मिळेल. मोदींनी यावेळी कुंभमेळ्याचाही उल्लेख केला. ते म्हणाले, कुंभमेळ्यात प्रत्येक दिवशी युरोपच्या लोकसंख्येएवढे लोक जमा होतात. त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
कोण-कोण सहभागी झाले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत या कार्यक्रमात भाजपाध्यक्ष अमित शहा, अर्थमंत्री अरुण जेटली, संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू, स्मृती इराणी, रविशंकर प्रसाद यांच्यासह पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते. हा कार्यक्रम याआधीच होणार होता, मात्र पंतप्रधान विदेश दौऱ्यावर असल्यामुळे पुढे ढकलण्यात आला.
पत्रकारांसोबतची दुसरी भेट
पंतप्रधान झाल्यानंतर पत्रकारांच्या भेटीची मोदींची ही फक्त दुसरी वेळ होती. गेल्या वर्षी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी ज्येष्ठ संपादकांची भेट घेतली होती. त्यावेळी विदेशी पत्रकारही सहभागी झाले होते.