आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Modi Say, Now Common People Doing Positive Thinking

सामान्यांचीही वाटचाल सकारात्मक विचारांवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशातील सामान्य नागरिकही आता सकारात्मक विचार करत आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. त्यासाठी त्यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे ५५ हजार लोकांनी केलेल्या सूचनांचा उल्लेख केला. मोदी म्हणाले, हजारो लोकांनी त्यांच्या पद्धतीने विचार मांडले. कुठलाही विचार मांडण्याचा अधिकार लोकांना देण्यात आला होता. त्यावर निर्बंध नव्हते. काही लोकांनी तक्रारीही केल्या. पण आश्चर्य म्हणजे जवळपास सर्वांनीच सकारात्मक, सर्जनशील विचार व्यक्त केले. याचाच अर्थ देशातील सामान्य नागरिकही आता सकारात्मक विचार करत आहे असा होतो, हे तर देशाचे केवढे मोठे भांडवल आहे, अशी टिप्पणी मोदींनी केली. मोदींच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा १२ वा भाग रविवारी प्रसारित झाला. त्यावेळी देशवासीयांशी संवाद साधताना मोदींनी हे विचार व्यक्त केले.

गंभीर तक्रारी करणारे फक्त १ ते २ टक्केच फोन मला आले. मात्र, ९० टक्क्यांपेक्षा जास्त जणांनी आनंददायी, ऊर्जादायी गोष्टींचाच उल्लेख केला, असा उल्लेख करून मोदी म्हणाले, देशात अस्वच्छतेच्या विरोधात वातावरण तयार होत आहे. आज देशात लहान मुलांपासून संसदेपर्यंत स्वच्छतेवर चर्चा होत आहे. हे विचारांचे आंदोलन आहे. स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण होत असल्याचेच हे द्योतक आहे. त्यामुळे सरकारांनाही काम करणे भाग पडेल. ग्रामपंचायत, नगर परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका असोत की राज्य अथवा केंद्र सरकार, प्रत्येकालाच या विषयावर काम करावे लागेल. काही कमतरता असल्या तरी आपल्याला ही मोहीम पुढे न्यावीच लागेल. २०१८ मध्ये आपण महात्मा गांधींची १५० वी जयंती साजरी करणार आहोत. त्या वेळी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने आम्हाला काम करावे लागेल. ‘स्वातंत्र्य आणि स्वच्छता यापैकी एकाची निवड मला करायला सांगितली तर मी स्वच्छतेला प्राधान्य देईन,’ असे गांधींजी म्हणाले होते. गांधीजींना स्वातंत्र्यापेक्षाही स्वच्छता प्रिय होती, हेच यावरून दिसते, असा उल्लेखही मोदींनी केला.

आयोगाची स्तुती
मतदान हे पवित्र कार्य आहे, अशी टिप्पणी करताना मोदी म्हणाले, ‘आधी मतदान, नंतर जलपान’ असा विचार सर्वांनी करावा. आज निवडणूक आयोग फक्त नियामक संस्था राहिलेली नाही, आयोग लोकांचा मित्र बनला आहे. आयोगाच्या प्रत्येक योजनेत मतदारच केंद्रस्थानी आहे.

मातीचे दिवे, खादी खरेदी करा
आगामी सण-उत्सवांत खादीचे कपडे खरेदी करा, दिवाळीत मातीचे दिवे वापरा, असे आवाहनही मोदींनी केले. त्यामुळे गरीब विणकर आणि कुंभारांच्या घरात सुखसमृद्धी येईल, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

३० लाखांनी सोडले अनुदान
मोदी म्हणाले, माझ्या आवाहनानंतर ३० लाख लोकांनी गॅसचे अनुदान सोडले आहे. अनुदान नाकारणारे श्रीमंत नाहीत, तर मध्यम व कनिष्ठ वर्गातील लोक आहेत.

नेताजींच्या कुटुंबीयांना भेटणार :
पंतप्रधान म्हणाले, ‘कोलकाता दौऱ्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातेवाईक मला भेटले होते. त्यांच्याशी मी बराच वेळ गप्पा मारल्या. त्यांचे नातेवाईक मला भेटण्यासाठी पंतप्रधानांच्या सरकारी निवासस्थानी येतील, असे त्या वेळी ठरले होते. वेगवेगळ्या देशांत राहणारे त्यांचे ५० नातेवाईक ऑक्टोबरमध्ये दिल्लीत येतील. नेताजींच्या नातेवाइकांना आयुष्यात बहुदा प्रथमच एकत्रितरीत्या पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानी येण्याची संधी मिळेल. माझ्यासाठी ही अत्यंत आनंददायी बाब असेल.