आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभावी धोरणामुळे गेल्या १७ महिन्यांत अर्थव्यवस्थेत प्रगती : मोदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशाच्या अर्थव्यवस्थेत गेल्या १७ महिन्यांच्या कालावधीत सर्व निकषांवर प्रगती होत आहे. महागाई, परदेशी गुंतवणुकीसह इतर अनेक मापदंडांवर आर्थिक सुधारणा झाली आहे. त्यासाठी प्रभावी धोरणांची अंमलबजावणी करण्यात आली. परंतु केवळ प्रसारमाध्यमांतील मथळे गाजवण्यासाठी नव्हे, तर लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी हे प्रयत्न व्हायला हवेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

सरकार परदेशातील काळा पैसा परत आणणार आहे. हा पैसा सुमारे १० हजार ५०० कोटींच्या घरात आहे, असा विश्वास देताना मोदी म्हणाले, १७ महिन्यांपूर्वी देशाच्या आर्थिक वाटचालीच्या तुलनेत आता अर्थव्यवस्थेत बदल जाणवू लागले आहेत. महागाई कमी होत चालली आहे. परदेशी गुंतवणुकीचे प्रमाण वाढले आहे. रुपया स्थिरावला आहे. या सगळ्या गोष्टी काही अपघाताने घडलेल्या नाहीत. योग्य धोरणांच्या अंमलबजावणीतूनच हे शक्य होऊ शकले आहे. केवळ प्रासंगिक गोष्टींमध्ये अडकून न पडता आर्थिक फेररचनेची कक्षा अधिक रूंदावण्यासाठी आपल्या कल्पनांना मर्यादा घालू नका, जेणेकरून सरकारी प्रयत्न केवळ वृत्तपत्रीय मथळ्यांपुरते मर्यादित न राहता ते जनमानसाच्या आकांक्षांचीदेखील पूर्तता करू शकतील. दिल्लीतील आर्थिक परिषद २०१५ मध्ये शुक्रवारी मोदी यांनी मार्गदर्शन केले. परिषदेला देश-विदेशांतील अर्थशास्त्रज्ञांची उपस्थिती होती.

मूल्य संवर्धनासाठी ‘जाम’चा फायदा
सरकारने रुपयाच्या अधिकाधिक मूल्य संवर्धनासाठी ‘जनधन’, ‘आधार’, ‘मुद्रा’या (जेएएम) योजना राबवल्या. त्यामुळे जास्तीत जास्त सशक्तीकरण, जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापरास प्रोत्साहन मिळाले आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

१७ महिन्यांत महत्त्वाचे निर्णय
{सरकारी बँकांच्या कार्यपद्धतीत बदल.
{ कोळसा, स्पेक्ट्रम, एफएम रेडिआे मधील मनमानी, वाटपाला मनाई.
{ कनिष्ठ पातळीवरील नोकरीत मुलाखतीला फाटा.
{ १९ काेटी जनता १७ महिन्यांत बँकेशी जोडली.

आयकरसाठी मूल्यमापन पद्धतीत बदल
आयकर विभागात भ्रष्टाचाराला अजिबात थारा मिळू नये यासाठी अधिकाऱ्यांच्या मूल्यमापनाच्या पद्धतीत बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे योग्य तेच आदेश बजावण्यासाठी अधिकाऱ्यांना प्रेरणा मिळू शकेल. एकुणात सरकार अनेक पातळ्यांवर भ्रष्टाचार कमी करण्यासाठी कटिबद्ध आहे.
बातम्या आणखी आहेत...