नवी दिल्ली - आधार कार्ड योजनेचा चेहरामोहराच बदलण्याची तयारी मोदी सरकारने केली आहे. शनिवारी पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी या योजनेचा आढावा घेतला.
बैठकीला उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना पंतप्रधान मोदींनी अशी विचारणा केली की, अनुदान असलेल्या योजना अधिक प्रभावीपणे राबवण्याच्या दृष्टीने या कार्डचा सुयोग्य वापर कशा प्रकारे करता येऊ शकेल यावर अधिकाऱ्यांनीही बरेच उपाय सुचवले. याशिवाय सरकारी कार्यालयांतील उपस्थितीवर देखरेख करण्याच्या दृष्टीने या कार्डचा उपयोग होऊ शकेल काय, यावरही विचार करण्यात आला. बैठकीला गृहमंत्री राजनाथसिंह आणि माहिती-प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद उपस्थित होते. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये आधार कार्ड वाटपाचे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. यावरही बैठकीत चर्चा झाली. ६६.९९ कोटी आधार क्रमांक आतापर्यंत वितरित करण्यात आले असून उत्तर प्रदेशात केवळ ४.६२ कोटी (लोकसंख्या १९.९५ कोटी) तर बिहारमध्ये १.४१ (लोकसंख्या १०.३८ कोटी) कोटी क्रमांक वितरित होऊ शकले आहेत.
आधार योजनेच्या माध्यमातून प्रशासकीय शिस्तीवर लक्ष ठेवण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या हालचाली सुरू असून या माध्यमातून पारदर्शक प्रशासनाचे उद्दिष्ट गाठणे शक्य होईल.