नवी दिल्ली- पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून सलग तिसऱ्या दिवशी गुरुवारीही संसदेत कामकाज होऊ शकले नाही. दोन्ही सभागृहांत आरोप-प्रत्यारोप होत राहिले. लोकसभेत भाजपचे अर्जुन मेघवाल यांनी प्रियंका गांधी यांचे पती राबॅर्ट वधेरा यांनी
फेसबुकवर केलेल्या पोस्टमुळे संसदेचा अवमान झाल्याचा आरोप केला. यासोबतच त्यांनी हक्कभंगाची नोटीसही बजावली. ही नोटीस संसदेच्या विशेषाधिकार समितीकडे पाठवण्यात आली आहे.
दरम्यान, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बाहेर माध्यमांशी बोलताना परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना लक्ष्य केले. एका फरार आरोपीला मदत करून स्वराज यांनी गुन्हा केला असल्याने त्यांना तुरुंगातच डांबले पाहिजे, असे राहुल म्हणाले.
लोकसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी राहुल यांनी सर्व विरोधी पक्षांच्या खासदारांशी चर्चा केली. स्वराज यांच्या राजीनाम्यासाठी संसदेत दबाव वाढवण्याबाबत या खासदारांत एकमत झाले. कामकाज सुरू होताच हे खासदार आक्रमक झाले. काँग्रेससह सर्व विरोधी पक्षाच्या खासदारांनी अगोदर स्वराज यांनी राजीनामा द्यावा, नंतरच चर्चा होऊ शकेल, अशी भूमिका घेतली. गोंधळातच दुपारनंतर सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.
आर्थिक घोटाळ्याचा आरोप असलेले आयपीएलचे माजी आयुक्त ललित माेदी यांच्याशी संबंध असल्याच्या मुद्यावर काँग्रेसने सुषमा स्वराज व राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच, मध्य प्रदेशातील गाजलेल्या व्यापमं घोटाळ्यात दिग्विजयसिंह यांनी राजीनामा द्यावा म्हण्ून काँग्रेसने दबाव वाढवला आहे. मात्र, केंद्र सरकारने यापैकी कुणीही राजीनामा देणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे.
राज्यसभेतही जोरदार चर्चा
दोन वेळा राज्यसभेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर दुपारी २.१० वाजता दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. तत्पूर्वी सभागृहात जोरदार चर्चा झाली. काँग्रेस, डावे पक्ष व समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी स्वराज, राजे व दिग्विजय यांच्या राजीनाम्याशिवाय चर्चा केलीच जाणार नाही, अशी आग्रही भूमिका घेतली. यावर जेटली म्हणाले, काँग्रेसचे आनंद शर्मा यांनी दिलेल्या नोटिशीत राजीनाम्याची अट घातलेली नाही. यावर पुन्हा गोंधळ सुरू झाल्यानंतर उपाध्यक्ष पी. जे. कुरियन यांनी कामकाज तहकूब केले.
राहुल संसदेबाहेर आक्रमक
संसद परिसरात पत्रकारांशी बोलताना राहुल यांनी थेट पंतप्रधान मोदी यांच्या हल्लाबोल केला. "मी खाणार नाही, कुणालाही पैसा खाऊ देणार नाही,' असे आश्वासन पंतप्रधानांनी दिले होते. त्यांच्या बाेलण्यात तथ्य आणि सत्यांश असला पाहिजे. मात्र, मोदी हवेतल्याच गोष्टी करतात, असे राहुल म्हणाले.
वढेरा फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात...
२१ जुलै रोजी रॉबर्ट वढेरा यांनी फेसबुकवर पोस्ट केली. यात म्हटले आहे की, संसद अधिवेशन सुरू झाले तसे मूळ मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी डावपेचही सुरू झाले आहेत. भारतीय जनता काही मूर्ख नाही. वाईट या गोष्टीचे वाटते की भारताचे नेतृत्व ही तथाकथित नेतेमंडळी करत आहे.
यावर लोकांच्याकही कॉमेंट्स आल्या. त्यावर वढेरा म्हणतात, लोकशाही व्यवस्था असलेल्या भारतात आपल्याला या हुकूमशाही व हस्तक्षेप करण्याच्या प्रवृत्तींवर विजय मिळवायचा आहे. मी काहीही लपवून ठेवलेले नाही. जोवर हे खोटे आरोप होत राहतील तोवर मी लढत राहीन...