आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PM च्या कार्यक्रमात CM चंडींना ठेवले दूर, राहुल म्हणाले - हा केरळचा अपमान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/ तिरुवनंतपुरम - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा केरळ दौरा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. श्री नारायण धर्म परिपालना योगमच्या (एसएनडीपी) कार्यक्रमासाठी केरळचे मुख्यमंत्री ओमन चंडी यांना आधी निमंत्रण देऊन नंतर नकार देण्यात आल्यामुळे नवा वाद सुरू झाला आहे.
या प्रकरणामुळे संतापलेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी हे राज्यातील जनतेचा अपमान करत असल्याचा आरोप केला. दरम्यान, या प्रकरणावरून संसदेतही प्रचंड गदारोळ झाला. एसएनडीपीच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी कोल्लममध्ये मंगळवारी माजी मुख्यमंत्री आर. शंकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करतील. एसएनडीपी ही मागासवर्गीय हिंदू मानल्या जाणाऱ्या एझवा समाजाची संघटना आहे. पुढच्या वर्षी केरळमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने एसएनडीपीसोबत नुकतीच युती केली आहे. दरम्यान, या कार्यक्रमासाठी पंतप्रधानांसोबतच चंडी यांनाही निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, नंतर अचानकच त्यांना कार्यक्रमापासून दूर राहण्यास सांगण्यात आले. चंडी यांनी फेसबुकच्या माध्यमातून आपले मत मांडले आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमापासून वंचित ठेवणे हा दु:खद अनुभव आहे. अशा प्रकारचे कृत्य म्हणजे राज्यातील जनतेचा अपमान होय, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणाचे पडसाद संसदेतही पाहायला मिळाले. लोकसभेत काँग्रेस आणि भाजपच्या खासदारांत जोरदार खडाजंगी झाली. पंतप्रधानांच्या घटनात्मक पदाचा राजकीय बदला घेण्यासाठी वापर केला जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
मात्र, गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या प्रकरणाशी केंद्र सरकारचा काहीच संबंध नसल्याचे सांगून हात झटकले आहेत. आयोजकांमध्ये मुख्यमंत्र्यांना बोलावण्यावरून मतभेद होते आणि त्यामुळेच त्यांना बोलावण्यात आले नाही, असेही ते म्हणाले. दरम्यान, एसएनडीपीप्रमुख वेलापल्ली नातेसन यांच्या मते, भारतीय जनता पक्षाच्या सांगण्यावरून नव्हे, तर आपणच चंडी यांचे नाव कार्यक्रमातून वगळले.

मुख्यमंत्री जनतेचे प्रतिनिधी
मुख्यमंत्री हे केरळच्या जनतेचा आवाज आहेत. पंतप्रधानांनी याच आवाजाचा अपमान केला असून ते कधीच स्वीकारार्ह नाही.
राहुल गांधी, उपाध्यक्ष, काँग्रेस

सरकारची भूमिका नाही
एसएनडीपी ही एक सामाजिक संस्था असून कोणाला बोलावायचे आणि कोणाला नाही, हा त्यांचा निर्णय आहे. त्यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांना आधी निमंत्रण पाठवलेही असेल. मात्र, नंतर त्यांचे मत बदलले असेल. यात केंद्र सरकारची काहीच भूमिका नाही.
राजनाथ सिंह, गृहमंत्री
बातम्या आणखी आहेत...