आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भ्रष्टाचाराविरोधातील मोहीम युवकांनी पुढे न्यावी; पंतप्रधानांची 29वी ‘मन की बात’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशभरात स्वच्छता अभियान सुरू झाले आहे, त्याचप्रमाणे युवकांनी डिजिटल पेमेंट मोहीम पुढे न्यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  रविवारी केले. भ्रष्टाचार आणि काळा पैसा यांच्या विरोधात डिजिटल पेमेंट मोहीम शस्त्राप्रमाणे वापरली जाईल, असे त्यांनी सांगितले. आपल्या २९ व्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात त्यांनी देशवासीयांना संबोधित केले.  
 
देशाच्या काही भागांत विधानसभा निवडणूक असल्याने मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घेतली होती. ३० मिनिटांच्या संबोधनादरम्यान पंतप्रधानांनी भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढाईला आणखी वेग द्यावा, असे आवाहन युवकांना केले. ते म्हणाले की, लोक आता खिशात रक्कम ठेवण्याच्या मानसिकतेत बदल करत आहेत. आता मोबाइलच त्यांच्या व्यवहाराचे साधन होत आहे. दोन महिन्यांत डिजिटल पेमेंटवर १० लाख लोकांना १५० कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे. आठ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय झाला, त्याला १४ एप्रिलला १०० दिवस पूर्ण होत आहेत. त्याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२६ वी जयंती आहे. त्यामुळे त्या दिवशी प्रत्येक युवकाने ‘भीम’ अॅपद्वारे १२५ लोकांना जोडावे.  
 
भारताच्या दृष्टिहीनांच्या क्रिकेट संघाने टी-२० जागतिक करंडक स्पर्धेत पाकिस्तानला धूळ चारली होती. मोदी यांनी या संघाचे अभिनंदन केले. रिओ पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचेही त्यांनी कौतुक केले. ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ मोहिमेचा उल्लेख करत पंतप्रधानांनी प्रत्येक क्षेत्रात महिलांचे योगदान ही अभिमानाची बाब आहे, अशी टिप्पणी केली.  

देशाच्या विकासासाठी तरुण वैज्ञानिकांना आवाहन  
तांत्रिक क्षेत्रात मजबूत होऊन जगात देशाला पुढे न्या, असे आवाहन पंतप्रधानांनी तरुण वैज्ञानिकांना केले. ते म्हणाले की, १५ फेब्रुवारीला इस्रोने अंतराळ तंत्रज्ञानात जागतिक विक्रम केला, तो क्षण भारतासाठी अभिमानाचा होता. त्यांनी मंगळयान मोहिमेचाही उल्लेख केला. ते म्हणाले, भारताच्या कार्टोसॅट-२ डी उपग्रहाच्या माध्यमामुळे जलस्रोत, कृषी विकासात मदत मिळेल. संरक्षणातही बॅलेस्टिक इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची चाचणी करून भारत निवडक देशांत सहभागी झाला आहे. नीती आयोग, १४ व्या प्रवासी भारतीय दिनी स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात उत्तम मॉडेल सादर झाले. 

विक्रमी उत्पादनासाठी शेतकऱ्यांचे कौतुक  
पंतप्रधान म्हणाले की, देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतीचे मोठे योगदान आहे. या वर्षी २७ लाख टनांपेक्षा जास्त धान्योत्पादन झाले आहे. ते गेल्या विक्रमापेक्षा ८ टक्क्यांनी जास्त आहे. डाळींमुळे गरिबांना जास्त प्रथिने मिळतात, त्यामुळे शेतकऱ्यांनी डाळींचे जास्तीत जास्त उत्पादन घ्यावे, असे आवाहनही मोदींनी केले.  
 
बातम्या आणखी आहेत...