आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्कराने इस्रायलसारखे सर्जिकल स्ट्राइक केले, लष्कराचे कर्तृत्व कमी नाही-मोदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंडी - भारतीय लष्कराची तुलना इस्रायली लष्कराशी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांचे कौतुक केले. ‘आजकाल देशभर आपल्या लष्कराने केलेल्या पराक्रमाची चर्चा सुरू आहे. पूर्वी इस्रायलने अशा कारवाया केल्याचे आपण ऐकत होतो. मात्र, आता आपल्या लष्कराने जे करून दाखवले ते कुठेही कमी नाही,’ असे मोदी म्हणाले.

हिमाचल प्रदेशात तीन जलविद्युत प्रकल्पांचे उद््घाटन मोदी यांच्या हस्ते झाले. यानंतर मंडी येथे परिवर्तन रॅलीतही ते सहभागी झाले. या वेळी मोदींनी सर्जिकल स्ट्राइक व लष्करातील वन-रँक वन पेन्शनवरही भाष्य केले.

‘मी लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रचारादरम्यान अनेकदा लष्करातील वन रँक वन पेन्शनबद्दल बोललो होतो. आज मी जवानांना आनंदाने सांगू इच्छितो की तुमचा हक्क तुम्हाला या सरकारने दिला आहे. चाळीस वर्षांपासून जवान हक्क मागत होते. कित्येक सरकारे आली, गेली. आम्ही ते करून दाखवले,’ असे मोदी म्हणाले.

...याची लाज वाटते
आधुनिक काळातही सामाजिक भेदांमुळे दलितांवर अत्याचार होत असल्याचे आपण ऐकतो. हे ऐकून मला लाज वाटते. स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही हे प्रकार सुरू राहावेत, हे दुर्दैव आहे. आपल्याला वृत्ती बदलावी लागेल. दलित, आदिवासी तरुणांना संधी मिळायला हव्यात, असेही मोदी म्हणाले.

अडगळीतील प्रकल्प शोधावे लागले
विरोधी पक्षांवर टीका करताना मोदी म्हणाले, मी पंतप्रधान झालो तेव्हा मला पंतप्रधान आणि पीएमओलाच पुरातत्त्व विभागासारखे काम करावे लागेल असे वाटले नव्हते. मला नव्या प्रकारचा पुरातत्त्व विभाग उघडावा लागला. बाबा आदमच्या काळातील अर्धवट प्रकल्प शोधून ते पूर्ण करायचे आव्हान होते. नांगल-तलबडा रेल्वे प्रकल्प १९८१ मध्ये मंजूर झाला. ३५ वर्षे झाली तो अजूनही अपूर्णच आहे.

मुख्यमंत्र्यांनाही कानपिचक्या
हिमाचलचे मुख्यमंत्री वीरभद्रसिंह यांनाही मोदींनी जाहीर सभेत चांगल्याच कानपिचक्या दिल्या. ‘भाजपचे शांताकुमार मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांची ओळख पाणीवाले मुख्यमंत्री अशी झाली. धूमल यांनी गावागावांत रस्ते करून नाव केले. दुसऱ्या पक्षाचे मुख्यमंत्री झाले तर स्वकल्याणाचाच मार्ग त्यांनी पत्करला. सध्याच्या मुख्यमंत्र्यांची ओळख काय हे मी कशाला सांगायला हवे?’

लुधियानात ५०० चरखे वाटप
पंतप्रधान मोदी यांनी लुधियानात एका कार्यक्रमात ५०० महिलांना चरख्यांचे वाटप केले. त्यांनी स्वत:ही एका चरख्यावर सूत कातून उपस्थितांना प्रोत्साहन दिले.
पुढे पाहा, संबंधित PHOTOS
बातम्या आणखी आहेत...