नवी दिल्ली- गौतम बुद्धांनी संपूर्ण जगाला संकटातून सावरण्याची शिकवण दिली. बुद्धांच्या विचारांशिवाय 21वे शतक शक्य नसल्याचे प्रतिपादन पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी केले. बुद्ध पोर्णिमानिमित्त तालकटोरा स्टेडियमवर आयोजित 'इंटरनॅशनल बुद्ध पौर्णिमा सेलिब्रेशन 2015' या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदींनी संबोधित केले.
कार्यक्रमाच्या उद्धाटनानंतर भगवान बुद्ध यांचे जन्मस्थळ नेपाळ, भारत आणि तिबेटमध्ये आलेल्या विध्वंसकारी भूकंपातील मृतांना श्रद्धाजंली वाहण्यात आली. तसेच भूकंपग्रस्तांसाठी सामूहीक प्रार्थनाही करण्यात आली. आम्ही नेपाळच्या दु:खात सहभागी असल्याचा पुनरुच्चारही मोदींनी यावेळी केला.
नेपाळ सध्या मोठ्या नैसर्गिक संकटाचा सामना करत आहे. बुद्ध पौर्णिमेच्या पावणपर्वाला नेपाळकडे पाहून अस्वस्थ वाटते. नेपाळमधील भूकंपग्रस्तांना भविष्यात अनेक वर्षे संघर्ष करावा लागणार आहे. नेपाळमध्ये आलेल्या भूकंपामुळे क्षणात होत्याचे नव्हते झाले आहे.
आपण सगळे त्यांच्या दु:खात सहभागी आहोत. बुद्धांच्या शिकवणीतून नेपाळ पुन्हा एकदा उभा राहील, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.
मानवाच्या कल्याणासाठी गौतम बुद्धांनी 25 वर्षांपूर्वीच भविष्यवाणी केली होती. हजारो पुस्तकांच्या तुलनेच बुद्धांचा एकच विचार पुरेसा आहे. यातूनच युद्ध मुक्ती होऊ शकते, असेही मोदींनी सांगितले. बुद्धांचे विचार मानव जीवनाचा आधार आहे. 'आत्म दीपो भव', बुद्धांनी मानव जातील अष्टागिंक मार्ग दाखवला असून सम्यक शिकवण दिली आहे.
मोदी म्हणाले, आज आपण ज्या काही संकंटाचा सामना करत आहोत, त्यावर बुद्धांनी आधीच तोडगा काढून ठेवला होता. आपल्याला युद्ध आणि संकटांपासून मुक्ती मिळवायची असेल तर, आपण त्याग करणे शिकले पाहिजे. प्रत्येकाच्या मनात अदैत भावना जागृत व्हायला हवी, हे बुद्धांनी हजारो वर्षांपूर्वीच आपल्याला सांगितले होते.