आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्न प्रक्रिया क्षेत्रात 68 हजार कोटींची गुंतवणुक; पतंजली, कोका कोलाचाही समावेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ‘कॉफीटेबल’ बुकचे प्रकाशन करण्यात आले. - Divya Marathi
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ‘कॉफीटेबल’ बुकचे प्रकाशन करण्यात आले.
नवी दिल्ली- भारतीय तसेच विदेशी फूड कंपन्यांनी भारतात ६८,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. यामध्ये आयटीसी, पेप्सिको, पतंजली अाणि कोका कोला यांचाही समावेश आहे. शुक्रवारी झालेल्या “वर्ल्ड फूड इंडिया-२०१७’ परिषदेमध्ये अन्न प्रक्रिया मंत्रालयाने १३ करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. परिषदेच्या आणखी दोन दिवसांमध्ये आणखी काही करार होण्याची शक्यता असल्याचे अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी सांगितले.
 
पेप्सिकोने १३,३०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून फूड-बेव्हरेज प्रकल्प उभा करण्याची घोषणा केली आहे. कोका कोला ज्यूस बॉटलिंग आणि अन्न प्रक्रिया प्रकल्प उभा करणार आहे. त्यासाठी कंपनी ११,००० कोटी रुपये खर्च करणार आहे.  तर आयटीसी आणि पतंजलीने १० - १० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले आहेत. या परिषदेत ३० देशांतील २०० कंपन्यांचे सुमारे २,००० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. यात ५० जागतिक कंपन्यांचे सीईओदेखील आहेत. देशातील २८ राज्यांनीही या परिषदेत सहभाग घेतला आहे. 

मेक इन इंडियामध्ये अन्न प्रक्रिया या क्षेत्राला सर्वाधिक प्राधान्यक्रम असलेल्या क्षेत्रांच्या यादीत ठेवण्यात आले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या तीनदिवसीय परिषदेच्या उद््घाटनप्रसंगी सांगितले. देशात उत्पादित अन्न उत्पादनाच्या ट्रेडिंगमध्ये १०० टक्के एफडीआयला परवानगी देण्यात आली आहे. करार तत्त्वावरील शेती आणि कच्च्या मालाची उपलब्धता यांसारख्या क्षेत्रांत गुंतवणुकीची आवश्यकता असल्याचेही मोदी म्हणाले. यात पिकाच्या सुरुवातीच्या प्रक्रियेपासून ते साठवणूक आणि प्रिझर्व्हेशन इन्फ्रास्ट्रक्चर, शीतगृह आणि शीतगृहातून वाहतूक यांचाही समावेश आहे. ऑर्गेनिक आणि फोर्टिफाइड खाद्य क्षेत्रात गुंतवणुकीला अनेक संधी असल्याचेही ते म्हणाले. अनेक विदेशी कंपन्यांनी भारतात करारावर शेती करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे भविष्यात जागतिक सुपरमार्केट चेनचा पुरवठादार हब म्हणून भारत उदयास येण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.  

अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री कौर यांनी सांगितले की, देशात पाच वर्षांत खाद्यपदार्थांची मागणी दुपटीने वाढण्याची अपेक्षा आहे. भारत जगातील सर्वात मोठा सहावा धान्य तसेच किराणा बाजार आहे. यावर्षी या क्षेत्रात विदेशी गुंतवणूक ४० टक्क्यांनी वाढली आहे. अन्न प्रक्रिया बँक बनवण्याचाही आम्ही विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले, तर भविष्यात अन्न प्रक्रिया हा देशातील महत्त्वाचा उद्योग ठरणार असल्याचे मत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले आहे.भारतात आतापर्यंत केवळ २ टक्क्यांपासून ते १० टक्क्यांपर्यंत कृषी उत्पादनावर प्रक्रिया होत असल्याचे मोदी यांनी उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींना सांगितले. जर ३० टक्के कृषी उत्पादनावर प्रक्रिया होण्यास सुरुवात झाली तर देशाच्या जीडीपीत पाच टक्के वाढ होईल. येथे कृषी हा मजबूत आधार आहे. शहरीकरणाबरोबरच मध्यमवर्गीयांची संख्यादेखील वाढत आहे. लोकांचे उत्पन्न वाढत आहे. यामुळे प्रक्रिया केलेल्या अन्नाची मागणीदेखील वाढणारच आहे. सध्या प्रक्रिया झालेल्या अन्नाचा देशांतर्गत बाजार सुमारे १२ लाख कोटी रुपयांचा आहे. हे उद्योग क्षेत्र वार्षिक १२ टक्क्यांच्या गतीने वाढत आहे.
 
रेल्वेचा प्रवासी ग्राहक होऊ शकतो : मोदी  
अन्न प्रक्रिया उद्योगाच्या संधींबाबत एक उदाहरण देताना पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, दररोज सुमारे १० लाख रेल्वे प्रवासी रेल्वेमध्ये जेवण करतात. हा प्रत्येक प्रवासी या उद्योग क्षेत्राचा ग्राहक होऊ शकतो. प्रत्येक राज्य स्पेशलायझेशन करू शकेल असा कमीत कमी एक पदार्थ निवडण्याचेही मोदी यांनी सांगितले.

संजीव कपूर तयार करणार खिचडी.. 
- प्रसिद्ध शेफ आणि या इव्हेंटचे ब्रँड अॅम्बेसेडर संजीव कपूर वर्ल्ड रेकॉर्डसाठी खिचडी तयार करणार आहेत. अनाथ मुलांमध्ये या खिचडीचे वाटप केले जाणार आहे. 
- या माध्यमातून भारताच्या खिचडीला आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. 
- आधी सोशल मीडियावर अशा बातम्या आल्या होत्या की, या इव्हेंटमध्ये खिचडीला राष्ट्रीय पदार्थ जाहीर केले जाईल. 

मंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण.. 
- खिचडीला राष्ट्रीय पदार्श जाहीर करण्याबाबत बातम्या आल्याने अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर यांना स्पष्टीकरण द्यावे लागले होते. 
- त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले, नॅशनल फूडच्या विषयावर चांगलीच खिचडी शिजली, पण हा वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न आहे. 

ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केले होते आश्चर्य 
- खिचडीला नॅशनल फूड जाहीर केल्याच्या बातमीवर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनीही आश्चर्य व्यक्त केले होते. 
- त्यांनी ट्वीट केले होते की, म्हणजे आता आम्ही एखाद्याला खिचडी खाताना पाहिले तर आम्हाला प्रत्येकवेळी उभे राहावे लागणार की काय? किंवा चित्रपट पाहण्यापूर्वी खिचडी खाणे गरेजेचे असेल का?

65 हजार कोटींचा मेगा इव्हेंट.. 
- या इव्हेंटवर 65 हजार कोटी खर्च केले जाणार आहेत. केंद्राने केलेल्या दाव्यानुसार या इव्हेंटमधून जवळपास 10 लाख रोजगार निर्मिती होईल. 
- देशातील 28 राज्य या इव्हेंटचे पार्टनर बनणार आहेत. 50 ग्लोबल कंपन्यांचे सीईओ या इव्हेंटमध्ये सहभागी होतील. 
 
बातम्या आणखी आहेत...