आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शेजारधर्म; आजपासून नेपाळ दौर्‍यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी नेपाळ दौर्‍यावर रवाना होतील. दोन दिवसांच्या या दौर्‍यात दोन्ही देश आर्थिक तसेच अन्य क्षेत्रांत सहकार्य वृद्धिंगत करण्यावर भर देतील. पंतप्रधान मोदी यांनी पहिला परदेश दौरा करताना जूनमध्ये भूतानची निवड केली होती. त्यानंतर ब्रिक्स परिषदेसाठी त्यांनी ब्राझील दौरा केला. मात्र, परस्पर सहकार्याच्या दृष्टीने स्वत:हून आता नेपाळची निवड केली आहे. यातून मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाचे पैलू स्पष्ट होत आहेत.

पंतप्रधानपदाची शपथ घेताना भारताच्या सर्वच शेजारी राष्ट्रांचे प्रतिनिधी आवर्जून उपस्थित होते. तेव्हा मोदींनी शेजारधर्माचा दाखला देत शेजारी देश महत्त्वाचे असल्याचे म्हटले होते. भारतीय पंतप्रधानांनी अधिकृत नेपाळ दौरा करण्याचा हा योग 17 वर्षांनंतर जुळून आला आहे. 1997 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल नेपाळ दौर्‍यावर गेले होते. त्यानंतरचा भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच दौरा आहे.

नेपाळचे पंतप्रधान स्वागताला येणार
मोदी रविवारी सकाळी 10.50 वाजता काठमांडूत दाखल होतील तेव्हा नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला विमानतळावर त्यांचे स्वागत करतील. त्यांना 19 तोफांची सलामी देईल.

पशुपतिनाथाला अभिषेक
5 व्या शतकातील पशुपतिनाथ मंदिरात जाऊन मोदी दर्शन-पूजाविधीही करणार आहेत. त्यांची ही अर्ध्या तासाची भेट असेल. बागमती नदीच्या किनाºयावर हे प्राचीन मंदिर आहे. 108 विद्यार्थी वैदिक मंत्रांद्वारे मोदींचे स्वागत करतील.

17 वर्षानंतर भारतीय पंतप्रधानाचा दौरा
नेपाळच का? : भारतात ऊर्जेची वाढती गरज आणि त्यासाठी अनुकूल असलेली हिमालयातील साधन-संपत्ती हे मोदींच्या नेपाळ दौºयामागचे प्रमुख गुपित मानले जाते. या भेटीत दोन्ही देशांत धोरणात्मक ऊर्जा सहकार्य करार होण्याची शक्यता आहे. मोदी रविवारी नेपाळ दौºयावर जाऊन सोमवारी सायंकाळी मायदेशी परततील.

ऊर्जा शक्तीवर लक्ष
नेपाळमधील नद्यांवर जलविद्युत प्रकल्प उभारून दोन्ही देशांची ऊर्जेची गरज भागवली जाऊ शकते. यात अंशत: किंवा संपूर्ण गुंतवणूक करण्यात भारताला स्वारस्य.

नेपाळी नेत्यांची भीती
० ऊर्जा प्रकल्पांत गुंतवणूक करून नद्यांवर एक प्रकारे वर्चस्व मिळवू इच्छित असल्याची काही नेपाळी नेत्यांची धारणा आहे.
० नेपाळमधील राष्ट्रवाद व त्यातून निर्माण झालेला भारतविरोध तसेच 1960 च्या दशकात तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या काळात झालेल्या ऊर्जा कराराचा नेपाळला काहीही लाभ झाला नसल्याची तेथील लोकांची भावना आहे.

हरवलेला नेपाळी मुलगा मोदींसोबत
काही वर्षांपूर्वी जीत बहादूर नामक एक नेपाळी मुलगा मोदींना सापडला होता. त्याला मोदी उद्या आपल्यासोबत घेऊन जात असून त्याच्या आई आणि मोठ्या भावाकडे सुपूर्द करणार आहेत. जीत आता 26 वर्षांचा आहे. मोदी यांनी स्वत:च ट्विट करून ही माहिती दिली.

27 सप्टेंबर रोजीच्या आमसभेला हजेरी
संयुक्त राष्ट्रे- संयुक्त राष्ट्राच्या 27 सप्टेंबर रोजी होणार्‍या आमसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करणार आहेत. जागतिक मंचावरील त्यांचे हे पहिलेच भाषण असेल. सभेला आंतरराष्ट्रीय पातळीवरील 200 नेत्यांची उपस्थिती असेल. त्याचबरोबर विविध देशांचे परराष्ट्रमंत्रीही सहभागी होतील. संयुक्त राष्ट्राच्या 69 व्या आमसभेच्या निमित्ताने पंतप्रधानांना निमंत्रण देण्यात आले.