आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींनी मौन सोडले, पाककडून तमाशा, शांतता चर्चेसाठी दहशतवादमुक्त वातावरण आवश्यक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- काश्मिरातील फुटिरतावादी नेत्यांना पाकिस्तानने गोंजारल्यामुळे परराष्ट्र सचिव स्तरावरील द्विपक्षीय बोलणी रद्द झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी या विषयावरील मौन सोडले. उभय देशांतील संबंध वृद्धिंगत करू, असे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यासोबत ठरले होते. त्यासाठी परराष्ट्र सचिवांच्या भेटी सुरू करायच्या होत्या. परंतु या बोलणीआधीच पाकिस्तानने जम्मू-काश्मीरातील फुटीरतावादी नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन शांतता प्रस्थापित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांचा तमाशा केला, असे मोदी म्हणाले.
मोदी यांनी शुक्रवारी जपानी माध्यमांशी संवाद साधताना आपले मत मांडले. ते म्हणाले, आम्हाला पाकिस्तानसोबत मैत्रीपूर्ण, शांततामय आणि सहकार्याचे संबध हवे आहेत. सिमला करार आणि लाहोर जाहीरनाम्याअंतर्गत कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत. मात्र मी एक गोष्ट सांगू इच्छितो की, फलदायी चर्चेसाठी हिंसाचार आणि दहशतवादमुक्त वातावरण गरजेचे आहे.
> मोदी जपानची "स्मार्ट सिटी' टोकियोलाही भेट देणार आहेत. मोदी यांनी नुकतीच देशातील १०० शहरांना स्मार्ट सिटी करण्याची घोषणा केल्यामुळे या भेटीला महत्त्व आहे. जपानकडून भारताला नव्या तंत्रज्ञानाची भेट मिळण्याची अपेक्षा आहे.

> मोदी जपानचे पंतप्रधान शिंझो अॅबे आणि इतर नेत्यांसोबत सामरिक वैश्विक सहकार्य वृद्धिंगत करण्याबाबत चर्चा करतील. या दौऱ्यावर अनेक संरक्षण बिगरलष्करी अणु करार होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सायंकाळी जपानच्या पाचदिवसीय दौऱ्यावर रवाना होतील. हा दौरा सामरिक सहकार्याला नव्या पातळीवर नेण्याच्या अपेक्षांदरम्यान होत आहे. हा दौरा दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांत नवा अध्याय लिहिणार असल्याची अपेक्षा मोदी यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या अनुपस्थितीत गृहमंत्री राजनाथसिंह सरकारचे कामकाज पाहणार आहे.

वक्तव्याचे महत्त्व
गेल्याकाही दिवसांत पाकिस्तानकडून सीमारेषेवर प्रचंड प्रमाणात गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा होत आहे. यात भारताचे अनेक जवान शहीद झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या "पाकिस्तानकडून भ्रमनिरास झाला आहे' या आशयाच्या वक्तव्याला मोठे महत्त्व आले आहे.

भाजपच्या जाहीरनाम्यात अण्वस्त्र धोरणाचा आढावा घेण्याचे आश्वासन होते. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर मोदी यांनी तूर्तास अण्वस्त्र धोरण बदलणार नसल्याचे सांगितले. सीटीबीटी वा एनपीटीवर स्वाक्षरीच्या मुद्द्यावर ते म्हणाले, आमच्या मनात काेणताही विरोधाभास नाही. आम्ही नि:पक्ष अण्वस्त्र नि:शस्त्रीकरणासाठी कटिबद्ध आहोत.
नाराजीचे कारण
मोदीयांनी आपल्या शपथविधी सोहळ्यात सार्क देशांसह पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना आमंत्रण देत उभय देशांच्या संबंधांत स्वत:कडून नवा पुढाकार घेतला होता. भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांची २५ ऑगस्टपासून इस्लामाबादेत चर्चा होणार होती. मात्र पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी दिल्लीत काश्मिरातील फुटीरतावादी हुरियत नेत्यांची भेट घेतली होती. पाकच्या या "तमाशाला' भारताने तडकाफडकी इस्लामाबादेत होणारी परराष्ट्र सचिवांची चर्चा रद्दबातल करत चोख प्रत्युत्तर दिले.