आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Narendra Modi News, PM Jan Dhan Scheme, Delhi, India

मोदी सरकारचे जन-धन सुरू, पहिल्याच दिवशी दीड कोटी बँक खाती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘पंतप्रधान जन-धन योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी झाला.

योजनेच्या पहिल्याच दिवशी दीड कोटी नवीन बँक खाती उघडण्यात आल्याची माहिती त्यांनीच दिली.

मोदी सरकारच्या स्थापनेला १०० दिवस पूर्ण होण्याआधीच ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू करून पंतप्रधान मोदी यांनी २६ जानेवारी २०१५ पर्यंत साडेसात कोटी जनतेला या योजनेअंतर्गत लाभ दिले जाणार असल्याचे जाहीर केले. या योजनेअंतर्गत प्रत्येक खातेधारकाला एक डेबिट कार्ड आणि एक लाख रुपयांचा अपघात विमा मिळणार आहे.

भविष्यात त्यांना जीवन विमा आणि निवृत्तिवेतन योजनांच्या कक्षेत आणण्याचीही योजना आहे. पुढील वर्षीच्या २६ जानेवारीपर्यंत देशातील ७.५ कोटी कुटुंबांना या योजनेत आणण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

पंतप्रधानांनी राष्ट्रीय युनिफाइड यूएसएसडी प्लॅटफॉर्मचेही उदघाटन केले. बेसिक जीएसएम मोबाइलद्वारे बँकिंग सेवा देण्याची ही योजना आहे. ही योजना देशातील आर्थिक अस्पृश्यता दूर करेल. एक दिवसात दीड कोटी खाती उघडण्याच्या विक्रमामुळे सरकारमध्ये बसलेल्या लोकांचा विश्वास वाढेल, असे मोदी म्हणाले. माझे खाते बंद करण्यासाठी बँकेला २० वर्षे लागली होती, अशी आठवणही त्यांनी सांगितली.

बचत करणे हा आमचा पिढ्यान पिढ्यांचा संस्कार आहे. आपण भारतीय क्रेडिट कार्डाच्या साह्याने जगणारे नाहीत. गरीब लोक कर्जाची परतफेड वेळेवर करतात. श्रीमंतांची परतफेड सर्वांना माहीत आहेच, असे मोदी म्हणाले.

गुरूवारी देशातील ७६ ठिकाणी या योजनेसाठी जंगी कार्यक्रम घेण्यात आले. त्यात २० मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री सहभागी झाले होते. बँक खाती उघडण्यासाठी देशभरात
७७,८५२ शिबिरे लावण्यात आली होती. १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधानांनी या योजनेची घोषणा केली होती.
ही योजना दोन टप्प्यांत राबवण्यात येईल. पहिला टप्पा १४ऑगस्ट २०१४ ते १५ ऑगस्ट २०१५ पर्यंतचा आहे. दुसरा टप्पा १५ ऑगस्ट २०१५ ते १४ ऑगस्ट २०१८ पर्यंत राहील.
दुसऱ्या टप्प्यात शालेय विद्यार्थी आणि एकाच कुटुंबातील अन्य सदस्यांना या योजनेत सहभागी करून घेतले जाईल.

अंगठ्याच्या ठशावरही खाते
बँक खाती उघडताना एरव्ही कागदपत्रांसाठी गरिबांची ससेहोलपट होते. या योजनेअंतर्गत मात्र, ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली. ज्यांच्याकडे आधार कार्ड नसेल
किंवा छायांकित ओळखपत्र नसेल अशांचे अंगठ्याचा ठसा घेऊन बँक खाते उघडण्यात आले.
योजनेची ठळक वैशिष्ट्ये
> देशभरातील सर्व कुटुंबांना नजीकची बँक शाखा किंवा बिझनेस करस्पाँडन्टच्या माध्यमातून बँक सुविधा.
> सर्व खातेधारकांना १ लाख रुपये अपघात विमा आणि ३० हजार रुपये अतिरिक्त विमा कवच दिले जाईल. असंघटित क्षेत्रात निवृत्तिवेतन योजना सुरू करण्यात येईल.
> देशातील शहरी आणि ग्रामीण भागाचाही योजनेत समावेश. प्रत्येक खात्यासाठी ५ हजार रुपयांच्या ओव्हर ड्राफ्टची सुविधाही मिळेल.

मोदी म्हणाले...
> देशातील ४० टक्के लोकांकडे कुठलीच बँक खाती नाही. ते विकासात कसे सहभागी होतील?
> पुरुषांच्या व्यसनाधीनतेमुळे पैसे वाचून शकत नसलेल्या माता-भगिनींना आर्थिक शक्ती मिळेल.
>एक बँक खाते उघडल्यानंतर प्रत्येक कुटुंबाला बँकिंग आणि कर्ज सुविधा मिळेल.
>लोकांची सावकारांच्या जाचातून सुटका व सरकारी योजनांचा थेट लाभ घेण्याचा मार्ग मोकळा होईल.

आता किमान हजार रुपयांची पेन्शन
नवी दिल्ली | पेन्शनधारकांना आता किमान एक हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. ईपीएफओच्या अधिसूचनेनुसार ऑक्टोबरपासून वाढीव पेन्शन मिळेल. ईपीएफओने
कर्मचारी पेन्शन योजनेच्या (ईपीएस) मूळ वेतनाची मर्यादा ६,५०० वरून १५००० रुपये केली आहे. आजवर कमाल ६,५०० रुपयांचे ८.३३% म्हणजेच ५४१ रुपये पेन्शन
फंडात जात असत. मात्र आता वेतन मर्यादा पंधरा हजारांपर्यंत वाढल्यामुळे पेन्शन फंडात दरमहा १,२५० रुपये जातील.

स्वातंत्र्यसैनिकांच्या निवृत्तिवेतनात 2 हजारांची वाढ
मुंबई- स्वातंत्र्यसैनिकांच्या निवृत्तिवेतनात २००० रुपयांनी वाढवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. ही वाढ २ ऑक्टोबरपासून लागू होईल. या वाढीमुळे ८ हजारांऐवजी
१० हजार रुपये निवृत्तिवेतन मिळणार असून राज्यातील ८ हजार २५५ स्वातंत्र्यसैनिकांना लाभ होईल. स्वातंत्र्यसैनिकांना दरवर्षी १० हजार रूपयांच्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती
करण्यात येत होती, आता ही रक्कम आर्थिक वर्षाच्या सुरवातीला बँक खात्यात जमा होईल.