आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Narendra Modi Presents Bravery Awards To Maharashtra 4 Children

पंतप्रधानाच्‍या हस्‍ते राज्यातील चौघांना राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्रदान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी महाराष्ट्रातील ४ शूर बालकांसह देशातील २५ बालकांना राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने सन्मानित केले. पंतप्रधानांच्या ७, रेस कोर्स या निवासस्थानी आयोजित शानदार कार्यक्रमात ३ मुली आणि २२ मुले अशा २५ बालकांना ‘वर्ष २०१५’ च्या राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे पंतप्रधानांच्या हस्ते वितरण करण्यात आले. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी, भारतीय बालकल्याण परिषदेच्या अध्यक्षा गीता सिद्धार्थ या वेळी
उपस्थित होत्या.

पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित बालकांशी या वेळी संवाद साधला. ते म्हणाले, पुरस्कारप्राप्त बालकांच्या प्रसंगावधान व साहसामुळे इतरांचे प्राण वाचले. त्यांच्या या साहसाचे कौतुक आहे. यशाने हुरळून न जाता आपला विकास करून देशाच्या विकासात सहभागी होण्याचे आणि साहस हा आपला स्वभाव भाव बनविण्याचे आवाहन त्यांनी बालकांना केले. मनेका गांधी यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.शौर्य पुरस्कारामधील सर्वोच्च गणला जाणारा "भारत पुरस्कार' नागपूरच्या गौरव सहस्रबुद्धे याला मरणोत्तर जाहीर झाला. गौरवची आई रेखा आणि वडील कवळू सहस्रबुद्धे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. जळगाव जिल्ह्यातील कोथळीच्या नीलेश भिल, वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वेच्या वैभव घंगारे आणि मुंबईतील वाळकेश्वरच्या मोहित दळवी यालाही राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने गौरविण्यात आले.नागपूरच्या गौरव सहस्रबुध्दे याने अंबाझरी तलावात बुडणाऱ्या ४ मुलांचे प्राण वाचविले होते. त्यात गौरवला आपले प्राण गमवावे लागले. गौरवच्या या साहसी कर्तृत्वासाठी त्याला मरणोत्तर ‘भारत पुरस्कार’ जाहीर झाला होता.जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात राहणाऱ्या नीलेश रेवाराम भिल याने कोथळी येथे संत मुक्ताईच्या दर्शनासाठी आलेल्या एका छोट्या मुलाला मंदिरासमोरच्या घाटावर बुडताना वाचविले. नीलेश भिल हा कोथळी येथील जिल्हा परिषद शाळेत पाचवीत शिकत आहे. वर्धा येथील सेलू तालुक्यातील सिंदी रेल्वे येथील सहावीत शिकणाऱ्या वैभव घंगारे हा नंदी नदीकिनारी मित्रांसोबत खेळत असताना अचानक नदीला पूर आला. नदीतील पाण्याच्या प्रवाहासोबत वैभवचा मित्र सुहास बोरकर वाहून गेला. वैभवने जिवाची पर्वा न करता नदीत उडी घेतली व मित्राचे प्राण वाचविले.

प्रजासत्ताकदिनी राजपथावर होणाऱ्या पथसंचलनात ही बालके सहभागी होणार आहेत. पुरस्कारप्राप्त बालकांनी याआधी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपराज्यपाल नजीब जंग यांची
भेट घेतली.