आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींनी शरीफ यांना सुनावले, अतिरेक्यांवर त्वरित कठोर कारवाई करा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/ पठाणकोट- पठाणकोट हवाई दल तळावरील हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट होऊ लागतानाच पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. या चर्चेत मोदी यांनी या दहशतवादी हल्ल्याला जबाबदार लोकांविरुद्ध तत्काळ कारवाई करा, असेही सुनावले. त्यावर शरीफ यांनी हल्ल्यात सहभागी असलेल्या ज्या अतिरेक्यांची माहिती पुरवण्यात आली आहे, त्यांच्याविरुद्ध िनर्णायक कारवाई करू, असे आश्वासन दिले. दरम्यान, पठाणकोट हवाई दल तळावर हल्ला करणारे सर्व सहा दहशतवादी मारले गेले आहेत, मात्र शोधमोहीम बुधवारपर्यंत चालेल, असे संरक्षणमंत्री पर्रीकर म्हणाले.
पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ)सांगितले की, मंगळवारी दुपारी पाकिस्तानी पंतप्रधानांनी पठाणकोट दहशतवादी हल्ल्याबाबत फोन केला होता. पाकने या हल्ल्यास जबाबदार लोक आणि संघटनांविरुद्ध ठोस आणि तत्काळ कारवाई केलीच पाहिजे, अशी भूमिका मोदींनी चर्चेदरम्यान घेतली. त्यावर शरीफांनी हे आश्वासन दिले. या संदर्भात पाकिस्तानला ठोस आणि कारवाई करण्यायोग्य माहिती देण्यात आली आहे, असे पीएमओच्या निवेदनात म्हटले आहे.
संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पठाणकोट येथे पत्रकार परिषद घेतली.

त्रुटीमुळेच घुसखोरी; पर्रीकरांची माहिती
पर्रीकरम्हणाले की, मला काही त्रुटी जाणवतात. त्यामुळेच दहशतवादी आत घुसू शकले. परंतु सुरक्षेशी कोणतीही तडजोड झालेली आहे, असे मला वाटत नाही. एकदा चौकशी पूर्ण झाली की सर्व गोष्टी स्पष्ट होतील.. गरुड कमांडो वगळता कोणीही प्रत्यक्ष कारवाईत मारले गेले नाही. डिफेन्स सेक्युरिटी कॉर्प्सच्या पाच जवानांचे प्राण दुर्दैवामुळे गेले. मोहीम खूपच अवघड होती.

अतिरेक्यांकडे पाक बनावटीची उपकरणे
संरक्षणमंत्रीमनोहर पर्रीकर लष्कर आणि हवाई दल प्रमुखांसोबत पठाणकोट हवाई दल तळावर पोहोचले. ते म्हणाले की, शनिवारी पहाटे ३. ३० वाजेपासून ते रविवारी सायंकाळी ७. ३० वाजेपर्यंत असे ४० तास चकमक चालली. दहशतवाद्यांकडे पाकिस्तानी बनावटीची उपकरणे सापडली. आत मोठ्या संख्येने जिवंत बॉम्ब आहेत. त्यामुळे मृतदेह हस्तगत करण्यास उशीर लागला. सहाव्या दहशतवाद्याचा मृतदेह हस्तगत केलेला नाही. त्याच्याकडे स्फोटके असू शकतात. ज्या जवानांनी प्राणांची आहुती दिली, त्यांना युद्ध शहिदांचा दर्जा देण्यात येईल.

आव्हानात्मक मोहीम :
>हजार कुटुंबे हवाई दल तळावर राहतात. त्यांची सुरक्षा महत्त्वाची होती.
> २४ किलोमीटर क्षेत्रफळावर हवाई दल तळाचा परिसर.
> अन्य देशांचे प्रशिक्षणार्थी हल्ल्याच्या वेळी तळावर होते.
> ४० तास चालली दहशतवादी मारण्याची मोहीम. त्यानंतर शोधमोहीम सुरू.
> ५० किलो गोळ्या घेऊन घुसले होते दहशतवादी.
> २० अधिकाऱ्यांचे एनआयएचे पथक चौकशी करतेय.
बातम्या आणखी आहेत...