Home »National »Delhi» PM Narendra Modi Speaking At The Program On Civil Services Day.

सोशल मीडियावर स्वत:चा प्रचार करू नका, अधिकाऱ्यांनी गृहिणींकडून शिकण्याची गरज: मोदी

वृत्तसंस्था | Apr 22, 2017, 03:18 AM IST

  • देशातील नावीन्यपूर्ण अशा विविध प्रकल्पांची ‘न्यू बिगनिंग’ नावाची पुस्तिका तयार करण्यात आली, या पुस्तिकेचे प्रकाशन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले.
नवी दिल्ली- अधिकाऱ्यांनी गृहिणींकडून काही धडे घेण्याची गरज आहे, त्या अनेक अडचणी असल्या तरी सर्व गोष्टींचे व्यवस्थापन करतात, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ११ व्या नागरी सेवा दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात अधिकाऱ्यांना संबोधित करताना केले.
मोदी म्हणाले, सध्या स्पर्धेचा काळ आहे, आव्हाने मोठी आहेत. गृहिणींच्या योग्यतेकडे लक्ष दिले जात नाही हे आपण पाहिले असेल, पण जेव्हा कुटुंबाच्या प्रमुखाचे अचानक निधन होते तेव्हा गृहिणीच घर सांभाळण्यास सुरुवात करते. माझ्या म्हणण्याचा अर्थ सर्वात बुद्धिमान लोक आयएएस अधिकारी होतात, त्यामुळे कामही त्याच हिशेबाने व्हायला हवे. पुढील एक वर्षात कामाच्या गुणवत्तेत बदल व्हायला हवा. फक्त सर्वश्रेष्ठ होण्याने काम भागत नाही. जर तुम्ही सर्वश्रेष्ठचा ठसा स्वत:वर लावत असाल तर ती सवयच व्हायला हवी.
मोदी म्हणाले की, आधी सरकार सर्वकाही करत होते. आज अधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे. मी नेहमीच प्रामाणिक अधिकाऱ्यांसोबत राहिलो आहे. बदलत्या काळाची गरज लक्षात घेऊन कामाची नवी पद्धत विकसित करायला हवी आणि ते फक्त नियम व्हायला नको, तर प्रेरकही व्हायला हवे. आपला अनुभव ब्रेक तर बनत नाही ना? हे पाहायला हवे. ज्येष्ठतेचा बोजा इंग्रजांच्या काळापासून चालत आला आहे. आपण आपल्या अनुभवाला ओझे होऊ देऊ नये. जे काम मी सुरू केले ते माझ्या कनिष्ठांनी पुढे नेले याचा अभिमान आपल्याला वाटायला हवा.
सोशल मीडियावर स्वत:चा प्रचार करू नका :सोश मीडियाच्या ताकदीबद्दल मोदी म्हणाले की, सोशल मीडियाची ताकद मला चांगलीच माहीत आहे. सोशल मीडियाद्वारे लोकांना जागरूक केले जाऊ शकते. पण कामाच्या वेळी सोशल मीडियावर स्वत:चा प्रचार करण्याची गरज नाही. त्याचा वापर जनतेच्या भल्यासाठी करायला हवा.

जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पंतप्रधान पुरस्कार
‘प्रधानमंत्री पीक विमा योजने’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी जालन्याचे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांना ‘पंतप्रधान पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असा हा पुरस्कार आहे. महाराष्ट्राच्या महत्त्वाकांक्षी ‘मागेल त्याला शेततळे’चा देशातील १० अभिनव योजनांत समावेश झाला. विज्ञान भवनात प्रशासन सुधारणा व सार्वजनिक तक्रार निवारण मंत्रालयातर्फे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी २०१५-१६ साठी विविध श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान केले. ‘प्रधानमंत्री पीक विमा योजने’ची अंमलबजावणी करणाऱ्या देशातील सर्वच जिल्ह्यांनी प्रधानमंत्री पुरस्कारासाठी अर्ज केला होता. देशातील १२ जिल्ह्यांची यातून निवड करण्यात आली व त्यांचे सादरीकरण झाले , यानंतर अंतिम ४ जिल्ह्यांमधून जालना जिल्ह्याची निवड करण्यात आली.

- देशभरातील ८०३ योजनांपैकी १० योजनांची निवड नावीन्यपूर्ण प्रकल्पासाठी करण्यात आली. त्यात महाराष्ट्र शासनाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेचा समावेश आहे.

Next Article

Recommended