नवी दिल्ली - पक्षाचा व्हीप आणि संसद अधिवेशनाला गांभीर्याने न घेणार्या 30 भाजप खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचारण केले आहे. त्यांना पंतप्रधानांसमोर हजर राहून उत्तर द्यावे लागणार आहे. त्यांनी अर्थसंकल्पाच्या काळात पक्षादेशाचे उल्लंघन केले होते.
गेल्या आठवड्यात भाजपने सर्व सदस्यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनातील चर्चेत सहभागी होण्यासाठी व्हीप बजावला होता. परंतु ऐन मतदानाच्या वेळी 30 खासदार गैरहजर होते. त्या वेळी योगायोगाने विरोधी पक्षातील खासदारांची संख्या कमी होती. त्यामुळे सत्ताधारी पक्षाची बूज राखली गेली होती. अन्यथा सरकारवर नामुष्की ओढवली असती. पंतप्रधानांनी संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांच्याकडून गैरहजर खासदारांची यादी मागवली होती.
चौकशीत गैरहजर खासदारांची वेगळीच माहिती हाती आली आहे. 30 पैकी 20 खासदारांनी सभागृहाचे कामकाज सुरू झाले त्या वेळी अर्थात हजेरीपत्रकावर स्वाक्षरी केली होती. परंतु त्यांनी कामकाजाला मात्र दांडी मारली होती. नायडू यांच्यामार्फत पंतप्रधानांनी या खासदारांकडे उत्तर मागितले आहे. अशा खासदारांना लेखी माफी मागावी लागणार आहे. भत्ता घेऊन संसदेतून जाणार्या अशा 20 सदस्यांवर कारवाई का करण्यात येऊ नये, अशी विचारणाही करण्यात येणार आहे.
छायाचित्र : नंदन निलकेणींसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी