आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • PMO Refuses To Release Files On Netaji's Widow And Daughter

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुभाषचंद्र बोस यांच्याबाबत माहिती देण्यास केंद्राचा नकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - परराष्ट्रांशी संबंध बिघडण्याची शक्यता असल्यामुळे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विधवा एमिली शेंकेल आणि कन्या अनिता बोस यांच्याशी संबंधित दस्तऐवज माहिती अधिकारात जाहीर करता येणार नाही, असे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.

सुभाषचंद्र बोस यांच्यावर एक संकेतस्थळ चालवणारे चंद्रचूड बोस यांनी पत्रव्यवहाराच्या दस्तऐवजासाठी माहितीच्या अधिकाराखाली अर्ज पाठवला होता. पंतप्रधान कार्यालयाचे संचालक राजीव टोपनो यांनी उत्तरादाखल बोस यांना पत्र पाठवले आहे. हा दस्तऐवज गोपनीय असून तो गुप्त ठेवण्याचा अधिकार पंतप्रधान कार्यालयाला माहिती अधिकार कायद्याच्या 8(1)(अ) आणि 8 (2) कलमानुसार असल्याचे त्यात म्हटले आहे.

चंद्रचूड बोस नेताजींवर एक पुस्तक लिहीत आहेत. 1945 मध्ये बेपत्ता झालेल्या नेताजींशी संबंधित अनेक फायली सरकारच्या वेगवेगळय़ा खात्यांनी दडपून ठेवल्या आहेत, असे बोस म्हणाले. यापूर्वी ‘मिशन नेताजी’ चळवळीने माहितीच्या अधिकारात पंतप्रधान कार्यालयाकडे नेताजींशी संबंधित फायलींची माहिती मागितली होती आणि अशा 33 फायली या कार्यालयात असल्याची माहिती देण्यात आली होती.

नेताजींबद्दलची माहिती जाहीर करण्यासाठी कोणताही राजकीय पक्ष दबाव आणत नसल्यामुळे सरकारने ती दडवून ठेवली आहे. त्यामुळेच ती जनतेपासून दूर आहे, असे मत नेताजींच्या जीवनावर दोन पुस्तके लिहिणारे अनुज धर यांनी व्यक्त केले.

ब्रिटिशांच्या नजरकैदेत असताना नेताजींनी सुटका करवून घेतली आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी इतर देशांची मदत घेण्याच्या उद्देशाने ते विविध देशांत गेले. जपानच्या मदतीने ‘इंडियन नॅशनल आर्मी’ स्थापन केल्यानंतर 1945 मध्ये ते अचानक बेपत्ता झाले. या घटनेची चौकशी करण्यासाठी सरकारने नेमलेल्या मुखर्जी आयोगाने त्यांचा मृत्यू तैवानमध्ये 18 ऑगस्ट 1945 रोजी विमान अपघातात झाला, हा दावा खोडून काढला होता. त्यामुळे नेताजींच्या निधनाचे गूढ आजही कायम आहे.