आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मसरतच्या मुसक्या आवळल्या, काश्मीर खो-यात पुन्हा तणावाचे वातावरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - काश्मिरात सईद सरकारने मुक्त केलेल्या मसरत आलम या दहशतवाद्याने पुन्हा उच्छाद मांडल्यानंतर शुक्रवारी सकाळीच पोलिसांनी त्याला अटक केली. मसरतच्या मुसक्या आवळून फुटीरवाद्यांनी काढलेला मोर्चा पोलिसांनी अडवताच निदर्शकांनी जोरदार दगडफेक सुरू केली. यानंतर दिवसभर काश्मीर खोऱ्यात तणाव होता. पोलिस व निदर्शकांत धूमश्चक्री सुरू होती. दरम्यानत त्राल भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

पुलवामा जिल्ह्यात त्रालमध्ये जवानांशी झालेल्या चकमकीत दोन युवकांचा मृत्यू झाला होता. याच्या निषेधार्थ हुरियत कॉन्फरन्सने "त्राल चलो' मोर्चाचे आयोजन केले होते. यात दहशतवादी मसरत आलम आणि हुरियत नेते सहभागी होणार होते. मात्र गुरुवारी नजरकैदेत ठेवण्यात आलेला मसरत आलम याला शुक्रवारी सकाळीत पोलिसांनी अटक केली. मोर्चावरही बंदी घालण्यात आली. मसरत समर्थकांनी याच्या निषेधार्थ जोरदार दगडफेक सुरू केली. दिवसभर पोलिस व निदर्शकांत चकमक सुरू होती. हुरियत नेता सय्यद अली शहा गिलानी यालाही मसरतसोबत गुरुवारी रात्रीपासून त्याच्या घरात नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.

गिलानी दिल्लीहून गुरुवारी श्रीनगरमध्ये दाखल होताच त्रालमधील घटनेच्या निषेधार्थ मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चात मसरतसह इतर नेत्यांनी भारतविरोधी घोषणा दिल्या. पाकिस्तानचे ध्वजही फडकावले. यानंतर पोलिसांनी मसरतविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला नजरकैदेत ठेवले होते.

देशविरोधी कारवाया हाणून पाडू : भाजप
खोऱ्यात देशविरोधी कारवाया सहन केल्या जाणार नाहीत, असा इशारा भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी दिला. तर, भाजप नेते राम माधव यांनी म्हटले आहे की, मशरतच्या अटकेसाठी भाजपने सईद सरकारवर दबाव आणलेला नाही. दरम्यान, पीडीपीचे प्रवक्ते वाहिद-उल-रहेमान यांनी कुणाच्याही दबावाखाली मसरविरुद्ध कारवाई केलेली नाही असे म्हटले आहे.

पाकनेही तोंड खुपसले
हुरियत नेत्यांच्या अटकेचा पाकने निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते तसनीम असलम खान यांनी भारतात शांततेच्या मार्गाने हक्क मागण्याचा कुणालाच अधिकार नाह, असे म्हटले आहे.

बंडाचा गुन्हा
मसरतविरुद्ध बंड पुकारल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पोलिस सखोल चौकशी करत आहेत. पोलिसांच्या हाती एक चित्रफित लागली असून यात मसरत स्वत: भारताविरुद्ध घोषणाबाजी करत असल्याचे दिसत आहे. जमावाला भडकावण्याचा तो प्रयत्न करत होता. यानंत जमावातूनही भारतविरोधी घोषणाबाजी सुरू झाली.

देशद्रोहाचा गुन्हा नाही
हुरियत नेत्यांविरुद्ध पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही. मसरत आलम व अन्य नेत्यांविरुद्ध भारतीय दंडसंहितेच्या कलम १२० (ब), १४७, ३४१, ३४६, ४२७ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दुर्लक्ष करणार नाही
लोकांना भडकावणारे असे प्रकार राज्य सरकार सहन करणार नाही. याकडे दुर्लक्ष न करता कुणी शांततेचा भंग करत असेल तर कठोर कारवाई केली जाईल, असे जम्मू-काश्मीरमधील भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनी म्हटले आहे.