आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IIPM वर बनावट डिग्री दिल्याचा आरोप, अरिंदम चौधरींविरुद्ध तक्रार दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- विद्यार्थ्यांची फसवणूक आणि बनावट डिग्री दिल्या प्रकरणी प्रसिद्ध मॅनेजमेंट गुरु अरिंदम चौधरी यांच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. अरिंदम चौधरी आणि त्यांची संस्था IIPM विरुद्ध युजीसीने (युनिवर्सिटी ग्रांट कमीशन) तक्रार दाखल केली आहे. IIPM च्या माध्यमातून विद्यार्थ्यांची फसवणूक केली जात आहे. ही संस्था कोणत्याही नियामक संस्थेकडून मान्यता मिळालेली नाही, असा आरोप करण्यात आला आहे.
वडील आणि मुलाविरुद्ध पोलिस तक्रार
युजीसीने तक्रार दिल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचने IIPM चे संचालक अरिंदम चौधरी यांच्याविरुद्ध आयपीसी कलम 420 अंतर्गत फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. त्यांचे वडील मलयेंद्र किशो चौधरी यांच्याविरुद्धही तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या सविस्तर चौकशी करण्यात येत असून पुढील आठवड्यात ठोस कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
IIPM ला डिग्री देण्याचा अधिकार नाही
IIPM या संस्थेला कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून मान्यता मिळालेली नाही. यामुळे ही संस्था कोणत्याही विद्यार्थ्याला डिग्री देऊ शकत नाही, असे युजीसीने तक्रारीत म्हटले आहे. परवानगी नसतानाही ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. यासाठी 5 ते 14 लाख रुपये घेतले जात आहेत, असेही सांगण्यात आले आहे.
कोण आहे अरिंदम चौधरी
अरिंदम चौधरी IIPM या व्यावसायिक शिक्षण संस्थेचे संस्थापक आणि डीन आहेत. त्यांनी काही चित्रपटांची निर्मितीही केली आहे. संडे इंडियन नावाचे मासिक ते काढतात. भारतातील 13 भाषांमध्ये हे मासिक प्रकाशित केले जाते. अरिंदम अनेक टीव्ही शोजमध्ये दिसतात. मॅनेजमेंट गुरु म्हणून ते प्रसिद्ध आहेत. द ग्रेट इंडियन ड्रीम आणि काऊंट ऑर चिकिन बिफोर दे हैच ही त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अर्थविषयक 4ps हे वृत्तपत्रही ते काढतात. प्लॅनमॅन नावाच्या कंपनीचे मीडिया डिव्हिजनचा विस्तार केला जात आहे.