आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - पोलिओ लसीकरणाला लवकरच इंजेक्शनचा पर्याय उपलब्ध होणार आहे. पुढील वर्षापर्यंत हे इंजेक्शन बाजारात येऊ शकते. जागतिक आरोग्य संघटनेने भारतासह जवळपास 130 देशांमध्ये पोलिओ निर्मूलनासाठी ओरल पोलिओ व्हॅक्सिनऐवजी इंजेक्शनद्वारे लसीकरण करण्याची शिफारस केली आहे. दुबईमध्ये जागतिक लसीकरण संमेलनामध्ये डब्ल्यूएचओने सर्व सदस्य देशांसमोर 2018 पर्यंत पोलिओ समूळ नष्ट करण्याचे नवे लक्ष्य ठेवले आहे.
डब्ल्यूएचओमध्ये पोलिओ विभागाचे संचालक डॉ. हमीद जाफरी यांनी सांगितले की, लसीकरण संमेलनात पोलिस निर्मूलन याच विषयावर लक्ष केंद्रित करण्यात आले असून पोलिओ आजाराचे जगभरातून उच्चाटन करण्यासाठी तसेच लसीकरण मोहिमेला पाठबळ देण्यासाठी दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात जवळपास 130 देशांत ओरल व्हॅक्सिनऐवजी इंजेक्शनद्वारे लस देण्यात यावी, अशी शिफारस असून पोलिओ समूळ नष्ट करण्यासाठी 2018 पर्यंतची कालमर्यादा ठरवण्यावरही एकमत झाले आहे. भारतानेही पुढील वर्षापासून पोलिओ निर्मूलन मोहिमेत लसीऐवजी इंजेक्शनचा वापर करण्याचे संकेत दिले आहेत, अशी माहिती डॉ. जाफरी यांनी दिली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयात लसीकरण विभागाचे उपसंचालक डॉ. अजय खेडा यांनी सांगितले की, पुढील महिन्यात बैठक होत असून त्यात प्रस्ताव मान्य झाला तर पुढील वर्षीपासून त्याची देशभर अंमलबजावणी होईल.
इंजेक्शन का फायद्याचे?
इनअॅक्टिव्हेटेड पोलिओ लस (आयपीव्ही) इंजेक्शनमार्फत दिली जाते. थेट रक्तात दिल्या जाणा-या या लसीमुळे पोलिओस कारणीभूत तिन्ही विषाणूंचा एकदाच नायनाट होऊ शकतो. भारतात पारंपरिक पद्धतीत या विषाणूंसाठी वेगवेगळा डोस दिला जात आहे. इंजेक्शनमधून एकच डोस देता येईल, शिवाय पंगुत्व येण्याचा धोकाही राहणार नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.