आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- समाजवादी पार्टीचे नेते मुलायमसिंह यादव यांच्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानांवर गेल्या चार दिवसांपासून ठाम राहणार्या केंद्रीय पोलादमंत्री बेनीप्रसाद वर्मा यांनी बुधवारी सपशेल माघार घेतली. वर्मा यांनी बुधवारी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी यादव यांच्याविषयी केलेल्या विधानाबद्दल खेद व्यक्त केला. तथापि वर्मांच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टीसाठी अडून बसलेली सपा याबाबत गुरुवारी संसदीय पक्षाच्या बैठकीत अंतिम निर्णय घेणार आहे.
वर्मांच्या वादग्रस्त विधानाचे पडसाद बुधवारी दिवसभर राजधानी दिल्लीत उमटत होते. मुलायमसिंह आणि त्यांच्या पक्षाने सरकारसमोर बेनीप्रसाद यांची हकालपट्टी करा ही केवळ एकच मागणी ठेवली. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस रामगोपाल यादव यांनी धमकीवजा भाषेत सांगितले की, 'आम्ही सरकारला आतापर्यंत सर्मथन देत आहोत, परंतु कधीपर्यंत देत राहू याची खात्री नाही.' द्रमुकने पाठिंबा काढून घेतल्याने अडचणीत आलेल्या काँग्रेसने यातून मार्ग काढण्याची जबाबदारी संसदीय कामकाजमंत्री कमलनाथ यांच्यावर सोपवली. ते बेनीप्रसाद वर्मांसह पंतप्रधानांना भेटले. त्यांच्यात 10 मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर वर्मा यांनी त्यांच्या विधानांवर खेद व्यक्त केला. मुलायमसिंह यांच्यासह काही सपा खासदार पंतप्रधानांना भेटले. सकाळी नऊ वाजता होणार्या पक्षाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे यादव यांनी स्पष्ट केले. सपा नेते शैलेंद्रकुमार यांनी 'खेद व्यक्त करणे आणि माफी मागणे यात फरक आहे,' असे सूचक विधान केले.
पटेल-यादव भेट : या घडामोडीत संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी काँग्रेस नेते अहमद पटेल यांची भेट घेतली. जदयू नेते देवेश ठाकूर यांनी ही सौजन्य भेट असल्याचे म्हटले.
सुषमांची सोबत- बेनीप्रसाद यांच्या विधानावर लोकसभेत भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी मुलायमसिंह यादव यांना साथ दिली. त्यांनी सांगितले की, 'वैचारिक मतभेद ही वेगळी बाब आहे, परंतु मुलायमसिंह सभागृहाचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्याबद्दल बेनीप्रसाद वर्मा यांनी केलेले वक्तव्य हा हक्कभंग आहे. याची चौकशी करा व बेनीप्रसाद यांना हटवा.'
वाजपेयी सरकार बरे- त्याआधी रामगोपाल यादव यांनी म्हटले की, 'काँग्रेसच्या चुकांमुळेच अनेक पक्षांनी यूपीएची साथ सोडली आहे.एनडीएमध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी सर्वांना सोबत घेऊन चालत असत. हे काम पंतप्रधान मनमोहनसिंग करू शकत नाहीत. वाजपेयी सरकारच्या काळात घोटाळेही कमी होत असत.'
- काँग्रेसने सांगावे की, पाठिंब्याच्या बदल्यात किती कमिशन मला देत आहे. - मुलायमसिंह यादव
- माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्याबाबत खेद व्यक्त करतो. - बेनीप्रसाद वर्मा, केंद्रीय मंत्री
काय होती बेनीप्रसाद यांची आधीची विधाने- काँग्रेस तुम्हाला विचारणार नाही. सर्मथन देण्यासाठी पैसे घेता. खूप कमिशन खा, कुटुंबीयांना वाटा, विदेशात जमा करा.
- मायावती लुटत होत्या, परंतु हे (मुलायम) लुटारू, गुंड आहेत. दहशतवाद्यांसोबत त्यांचे संबंध आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.