नवी दिल्ली - खुर्ची वाचवण्यासाठी दिल्लीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तळ ठोकून बसले होते. शनिवारी सायंकाळी त्यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली.
दरम्यान, विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख व सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे हेही सोनियांना भेटले. चव्हाण यांची खुर्ची धोक्यात असल्याच्या भीतीने मुख्यमंत्री समर्थक आमदार दिल्लीत पोहोचले होते. त्यात शिवाजीराव देशमुख यांच्यासह आमदार संजय दत्त, अपक्ष आमदार जयकुमार गोरे, साता-याचे काँग्रेस आमदार आनंदराव पाटील, सुरेश जेथलिया, शिरीष कोतवाल, शिरीष चौधरी, दीपक आत्राम, राजन भोसले आदी होते.
मुख्यमंत्रिपदावर आपली लॉटरी लागेल म्हणून लॉबिंग करायला आलेल्या चव्हाण विरोधक काँग्रेस नेत्यांना शनिवारी अखेर माघारी फिरावे लागले. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांची नावे आघाडीवर होती.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी
शुक्रवारी रात्री मुख्यमंत्र्यांनी सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांच्याशी राज्यातील घडामोडींवर पाऊण तास चर्चा केली. शनिवारी सकाळी त्यांनी समीक्षा समितीचे अध्यक्ष ए. के. अँटनी आणि निरीक्षक गुलाम नबी आझाद यांची भेट घेतली.