आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political Parties Hand Behind The Muzffarnagar Riots,

मुजफ्फरनगर दंगलीमागे राजकीय पक्षांचा हात; निवडणूकांपूर्वी दंगल घडवण्‍याचा प्रयत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमधील दंगलीमागे काही राजकीय पक्षांचा हात आहे. 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीआधी काही पक्ष धार्मिक दंगली घडवू शकतात, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिला आहे. दंगलीचा विस्तृत अहवाल प्राप्त झाल्याशिवाय मी त्यामागील राजकीय कटाबाबत बोलू इच्छित नाही. मात्र, यामध्ये राजकीय पक्षांचा सहभाग शक्य आहे, असे शिंदे यांनी एका कार्यक्रमानंतर सांगितले.दंगलीत आतापर्यंत 40 जणांचे प्राण गेले आहेत. शिंदे म्हणाले, 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीआधी धार्मिक दंगल उसळू शकते, असा इशारा 11 राज्यांना दिला असून त्यानुसार सतर्क राहण्यास सांगितले आहे. निवडणूक जशी जवळ येईल तशा या हिंसाचारात वाढ होईल.


दरम्यान, मुस्लिम संघटनांनी उत्तर प्रदेशातील अखिलेश सरकार बरखास्त करण्याची मागणी बुधवारी केली. विरोधी पक्ष सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात असतात. मात्र, दंगल रोखण्याची संपूर्ण जबाबदारी सरकारवर आहे. त्यात त्यांना अपयश आल्याने अखिलेश यांनी सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे, विविध मुस्लिम संघटनांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले.


नाराज आझम यांची बैठकीला पाठ : दंगलीच्या मुद्द्यावरून समाजवादी पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर नाराज आझम खान यांनी बुधवारी पक्षाच्या आग्रा येथील राष्‍ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला पाठ फिरवली. सपा सरचिटणीस रामगोपाल यादव यांनी या गोष्टीला फार महत्त्व न देता सांगितले.


जनहित याचिकेच्या सुनावणीस तयार
मुजफ्फरनगर दंगलीची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दाखल करून घेतली. न्या. जी. एस. सिंघवी यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने या याचिकेची सुनावणी गुरुवारपर्यंत पुढे ढकलली. मोहंमद हारुण यांनी ही याचिका दाखल केली आहे.


केंद्रात पर्याय हवा : मुलायमसिंह
संपुआ सरकारने गेल्या दहा वर्षांत देशाची वाईट अवस्था केली आहे. त्यामुळे जनतेला आता बदल हवा आहे. हा हल्ला सपाप्रमुख मुलायमसिंह यादव यांनी केंद्र सरकारवर केला आहे. मुलायमसिंह समाजवादी पक्षाच्या राष्‍ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते.