नवी दिल्ली - राजधानीतील हवेचा दर्जा सध्या खालावत चालला आहे. शेजारील राज्यांतील कृषी उत्पादनातील टाकाऊ घटकांना जाळल्यामुळे दिल्लीतील वायु प्रदूषणात वाढ होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. दिल्लीवर धूसर वायूचा थर निर्माण झाला आहे.
शहरातील स्वच्छ हवेचे प्रमाण माेठ्या प्रमाणात घटले असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. श्वसनाशी संबंधित आजारांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले आहे. शहरातील सफाई कामगार कचरा जाळत असल्यानेही यात भर पडत आहे.
पर्यावरण कायद्यान्वये झाडाची पाने व कचरा जाळणे हा दंडणीय अपराध आहे. यासाठी ७ वर्षे कारावास व १ लाख दंडाची शिक्षा असूनही कचरा जाळण्याचे प्रमाण दिल्लीत वाढत असल्याचे पर्यावरणवादी डाॅ. नरेंदर कुमार यांनी सांगितले. थंडीचे प्रमाण वाढत असताना हा धूर प्रदूषणात भरच टाकत आहे.