आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Prakash Javadekar Dismisses BJP MP Dilip Gandhi's Remarks On Tobacco Consumption

तंबाखूने कर्करोग होतो याला पुरावा काय? खा. दिलीप गांधी यांच्या वक्तव्यावरून वाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - तंबाखूमुळे कर्करोग होतो याला पुष्टी देणारा देणारा कोणताही अभ्यास भारतात झालेला नाही. कर्करोग फक्त तंबाखूमुळेच होतो असे नाही, असे वक्तव्य तंबाखूमुळे होणाऱ्या दुष्परिणांचा अभ्यास करणाऱ्या संसदीय समितीचे प्रमुख, भाजप खासदार दिलीप गांधी यांनी केले.
या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. विरोधी पक्षांनी तसेच वैद्यकीय क्षेत्रातूनही या वक्तव्यावर टीकेची झोड उठवल्यामुळे सरकारला बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला. तंबाखूजन्य पदार्थ्यांच्या पाकिटावर तंबाखूमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची मोठ्या आकारात चित्रमय माहिती देण्यात यावी, असे निर्देश केंद्र सरकारने दिले होते. या निर्देशांची १ एप्रिलपासून प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सिगारेट आणि तंबाखूजन्य उत्पादनांचा कायदा, २००३ तसेच त्यातील विविध तरतुदींचा अभ्यास करण्यासाठी सरकारने खासदार गांधी यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय समिती स्थापन केली आहे.अमेरिकेत सिगारेट ओढणाऱ्यांवर जो परिणाम होतो तसा भारतीयांवर होत नाही का? भारतीयांवर सिगारेट आणि बिडीचा वेगळा परिणाम होतो का? इतर देशांत सिगारेट ओढणाऱ्यांना कर्करोग होत असल्याचे आढळले आहे. मग तसे भारतात होत नसेल का, असा सवाल पब्लिक हेल्थ फाउंडेशनच्या मोनिका अरोरा यांनी केला.
दिलीप गांधी समितीचे मत
- एमपी, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र व छत्तीसगडचे चार कोटी लोक तेंदूपत्ताच्या माध्यमातून बिडी व्यवसायात आहेत. त्यामुळे या मुद्द्यावर भारतीय दृष्टिकोनातून अभ्यास व्हायला हवा.
- यावर भारतीय दृष्टिकोनातून अभ्यास करत नाही, तोपर्यंत तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत चित्रमय माहिती देण्याचा निर्णय थांबवावा, असे समितीचे मत आहे.
धक्का बसला

कोणी असे वक्तव्य करू शकते हा धक्काच आहे. हे वक्तव्य दुर्दैवी आहे. त्यांना कोणीतरी चुकीची माहिती दिलेली असावी. सर्व संशोधक चुकीचे आहेत आणि एक व्यक्ती बरोबर आहे का?- सुप्रिया सुळे, खासदार

तडजोड नाही

अशा गोष्टी ऐकू नका. विज्ञान हे विज्ञान आहे. तुम्ही विज्ञानाशी तडजोड करू शकत नाही. -प्रकाश जावडेकर
हे संशोधन करा

खरे तर भाजप आणि सिगारेट, गुटखा उत्पादक यांच्यात काही हितसंबंध आहेत का, याच्यावरच संशोधन व्हावे. त्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल. - दिग्विजय सिंह
केंद्रीय निर्देश

केंद्राने तंबाखूजन्य उत्पादनांच्या पाकिटावर मोठ्या अक्षरांत चित्रमय स्वरूपात दुष्परिणामांबाबत माहिती देण्याबाबत सूचित केले आहे. आधीच्या ४०% जागेऐवजी अाता ते प्रमाण ८५ टक्के करण्यात आले आहे. ते रोखा अशी शिफारस गांधी समितीने केली.