आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pranav Mukharji Says, India Show A Way To The Intolerant World

असहिष्णू जगाला भारत मार्ग दाखवेल, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे मत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सध्या जगभरात अभूतपूर्व असहिष्णुता आणि पराकोटीचा द्वेष पाहावयास मिळतो आहे. अशा परिस्थितीत भारताची उच्च मूल्ये, विचारसरणीच जगाला तारू शकते व योग्य मार्ग दाखवू शकते. भारतीय समाजाने लिखित - अलिखित संस्कार, कर्तव्य व जीवनशैलीमध्ये या संकटाचे समाधान शोधले जाऊ शकते, असे मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केले.

राष्ट्रपती भवनात आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय भारतीय तत्त्वज्ञ संमेलनाचे उद््घाटन मुखर्जी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात जगभरातील भारतीय तत्त्वज्ञ सहभागी झाले आहेत. राष्ट्रपती यांनी सांगितले की, भारतीय तत्त्वज्ञानाचा (इंडोलॉजी) अभ्यास भारत आणि जगापुढील आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी प्रासंगिक आहे. या वेळी विविधतेने भरलेल्या समाजाला एक ठेवण्यासाठीची भारतीय मूल्ये जगभरात पुन्हा घेऊन जाण्याची गरज आहे. भारतीय संस्कृती जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. तिचे वेगळेपण आजही कायम आहे. तिच्या विविध प्रवाहांमध्ये ज्ञान, विज्ञान, संस्कारांचे अथांग भांडार दडलेले आहे. जगभरात सध्या भारतीय लोक पोहोचले असून ते त्यांच्यासोबत भारतीय संस्कृती तेथे घेऊन गेले आहेत. विविध क्षेत्रांत त्यांनी त्यांची ओळख निर्माण केली आहे.
प्रो. स्टिटेंक्रोन यांना भारतीय तत्त्वज्ञ पुरस्कार प्रदान
या परिषदेत जर्मनीतील प्रो. हेन्रिक फ्रेईहर फोन स्टिटेंक्रोन यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पहिला भारतीय तत्त्वज्ञ पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार म्हणून त्यांना २० हजार डॉलरची रक्कम आणि एक प्रशस्तिपत्र देण्यात आले. प्रो. स्टिटेंक्रोन हे टुएबिंगेन विद्यापीठात "भारतीय तत्त्वज्ञान धार्मिक इतिहासाचा तुलनात्मक अभ्यास' या विभागाचे गेल्या २५ वर्षांपासून अध्यक्ष आहेत. त्यांनी या विषयात विपुल लेखनही केले आहे. हा पुरस्कार दरवर्षी भारतीय तत्त्वज्ञान, चिंतन, इतिहास, कला, संस्कृ़ती,भाषा, साहित्य, परंपरा, सामाजिक जडणघडण आदींचा अभ्यास करण्याच्या कामी योगदान देणाऱ्या विदेशी विद्वानांना दिला जाणार आहे.