आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • President Change His Program For Narendra Modi's Hunkar Sabha

नरेंद्र मोदींच्या ‘हुंकार सभे’ साठी राष्‍ट्रपतींनी कार्यक्रम बदलला, एकच दिवस दौरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नियोजित बिहार दौ-यात एक दिवसाने कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्‍ट्रपती 26-27 ऑक्टोबर रोजी पाटण्यात थांबणार होते. मात्र, आता ते 26 रोजी दोन तासांचा कार्यक्रम आटोपल्यानंतर दिल्लीला परणार आहेत. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या 27 रोजी पाटण्यात होणा-या ‘हुंकार सभे’ साठी हा बदल करण्यात आल्याचे सांगण्यात येते. बिहारमधील भाजप नेते शहानवाज हुसेन व राजीव प्रताप रुडी यांनी राष्‍ट्रपतींची भेट घेतली होती.


शहानवाज हुसेन म्हणाले, राष्‍ट्रपती 26 ऑक्टोबर रोजी दीक्षांत समारंभात सहभागी झाल्यानंतर त्याच दिवशी दिल्लीला परतणार आहेत. राजीव प्रताप रुडी म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या 27 ऑक्टोबर रोजीच्या सभेमुळे राष्‍ट्रपतींच्या दौ-यात अडचण येऊ नये, अशी आमची इच्छा होती. राष्‍ट्रपतींनी त्यानंतर पाटण्यात दोनच तास थांबणार असल्याचे सांगितले. पाटण्यात पहिल्या दिवशी राष्‍ट्रपतींचे व दुस-या दिवशी भावी पंतप्रधानांचे स्वागत केले जावे ही आमच्यासाठी गौरवपूर्ण बाब आहे.


मोदी यांची सभा व राष्‍ट्रपतींच्या कार्यक्रमावरून भाजप व संयुक्त जनता दलामध्ये आरोप-प्रत्यारोप झाले होते. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मोदींची सभा उधळून लावण्यासाठी राष्‍ट्रपतींना 27 रोजी कार्यक्रमासाठी निमंत्रण दिल्याचा आरोप भाजपने केला आहे.


काय आहे प्रकरण ?
भाजप सत्तेतील घटक पक्ष असतानादेखील नितीशकुमार यांनी नरेंद्र मोदी यांची बिहारमध्ये सभा होऊ दिली नाही. मोदी यांची गेल्या 12 वर्षांत येथे सभा झाली नाही. दोन्ही पक्षांतील संबंध संपुष्टात आल्यानंतर भाजपकडून सभेची जोरदार तयारी सुरू होती. राष्‍ट्रपतींच्या 26-27 च्या दौ-यामुळे प्रोटोकॉलप्रमाणे हवाई वाहतुकीवर निर्बंध आले. राष्‍ट्रपती पाटण्यातून गेल्यानंतरच मोदी यांना त्या ठिकाणी येणे भाग होते. 27 रोजीच्या पूर्वनियोजित सभेत त्यामुळे अडथळा निर्माण झाला होता.