नवी दिल्ली- संसदेच्या संयुक्त अधिवेशनात सोमवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अभिभाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारचा ठोस अजेंडा मांडला. आपल्या तासाभराच्या अभिभाषणात मुखर्जी यांच्या तोंडी नरेंद्र मोदींचेच बोल होते. ते म्हणाले, लोकांनी ‘एक भारत-श्रेष्ठ भारता’साठी मते दिली आहेत. माझे सरकार ‘सबका साथ-सबका विकास’ याच तत्त्वाने सातत्याने काम करेल.’
वाढत्या महागाईला आवर घालण्यालाच केंद्र सरकारचा प्राधान्यक्रम असल्याचे सांगून सद्य:स्थितीत आर्थिक स्थिती सुधारण्याचे कठीण आव्हान असल्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्पष्ट केले. शेती, उद्योग, रस्ते सुरक्षितता, शिक्षण, मुस्लिमांचे प्रश्न, काश्मीर आणि सोशल मीडियासारख्या मुद्द्यांवरही त्यांनी संयुक्त अधिवेशनात सरकारचा अजेंडा सादर केला. टॅडिशन, टॅलेंट, टुरिझम, ट्रेड आणि टेक्नॉलॉजी या ‘5 टी’ वर राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात भर दिला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर काँग्रेस, सपा आणि बसपासारख्या विरोधी पक्षांनी मोदी सरकार जनतेला केवळ स्वप्न दाखवत असल्याचा आरोप केला.
राष्ट्रपतींनी कथन केले नरेंद्र मोदींचे स्वप्न!
अर्थव्यवस्था
अर्थव्यवस्था सुस्थितीत आणणे हा सरकारचा उद्देश आहे. अर्थव्यवस्थेची विकासाकडे वाटचाल व्हावी म्हणून आम्ही सर्वांच्या सहकार्याने कार्य करू. महागाई नियंत्रणात आणली जाईल आणि गुंतवणुकीलाही प्रोत्साहन मिळेल. रोजगाराला चालना दिली जाईल.
महागाई, भ्रष्टाचार
हे सरकार भ्रष्टाचाराला थारा देणार नाही. महागाई रोखण्यासाठी काळाबाजार करणार्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. कृषी तसेच कृषीवर आधारित उत्पादनांचा प्रमाणबद्ध पुरवठा व्हावा या दृष्टीने सरकारी पातळीवर सर्वतोपरी उपाययोजना केल्या जातील.
बेटी बचाओ...
मुलींचे वरचेवर कमी होत चाललेले प्रमाण लक्षात घेता केंद्रातील सरकार ‘बेटी बचाओ, बेटी बढाओ’ मोहीम सुरू करेल. महिलांवर होणारे अत्याचार कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत. यासंबंधीच्या कायद्यांचा पुन्हा आढावा घेतला जाईल.
महिला आरक्षण
संसदेत महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध आहे. या देशाच्या विकासात महिलांचे भरीव योगदान असल्याचे स्पष्ट करून राष्ट्रपतींनी महिला आरक्षण विधेयकाचा उल्लेख ठळकपणे केला.
दुष्काळाबाबतही सतर्क
यंदा देशभर कमी ते मध्यम पाऊस पडेल असा प्राथमिक अंदाज आहे. या दृष्टीने संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी विशेष योजना आखल्या जात आहेत.
तरुणांसाठी...
सर्वच राज्यांत आयआयटी आणि आयआयएम स्थापन केल्या जातील. एक राष्ट्रीय ई-ग्रंथालय स्थापन केले जाईल. प्रत्येकाच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न.