आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • President To Inaugurate CVC Function; PM To Be Guest Of Honour, Divyamarathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सीव्हीसी सुवर्ण महोत्सव: प्रामाणिक अधिकार्‍यांचा छळ नको : पंतप्रधान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- कल्याणकारी निर्णय प्रक्रियेत अधिकार्‍यांकडून झालेल्या चुकांसाठी त्यांचा छळ होता कामा नये, असा इशारा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सोमवारी दिला. अधिकार्‍यांवरील हे दडपण वेळीच थांबले नाही, तर निर्णय प्रक्रियेवर त्याचा दूरगामी परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाला कीड लागू शकते, असे त्यांनी म्हटले आहे.

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर संयमाने चर्चा होणे गरजेचे आहे. अधिकार्‍यांना ‘दोषी किंवा अप्रामाणिक’ ठरवण्याची वृत्ती बदलली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. केंद्रीय दक्षता आयोगाच्या (सीव्हीसी) सुवर्णमहोत्सवी समारंभात मार्गदर्शन करताना डॉ. सिंग बोलत होते. प्रशासनातील भ्रष्टाचार दूर करणे हे कोणत्याही भ्रष्टाचार प्रतिबंधक यंत्रणेचे उद्दिष्ट असते; परंतु ही प्रक्रिया राबवताना विनाकारण अधिकार्‍यांचा छळ होता कामा नये, याची खबरदारी घेतली गेली पाहिजे. सीव्हीसीचा कारभार दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या शब्दांत सांगायचे तर सीव्हीसी एकात्मतेचा निर्भीड विजेता आणि भ्रष्ट अधिकार्‍यांसाठी जरब बसवणारे असले पाहिजे. अशाच प्रकारचे काम देशातील इतर संस्थांमध्येदेखील व्हायला हवे. अधिकारी चांगल्या उद्देशातून काही निर्णय घेतात; परंतु काही वेळा त्यात चुकाही घडून येतात. त्यामुळेच त्यांचा चौकशीच्या पातळीवर छळ होऊ नये, याची काळजी घेतली गेली पाहिजे, असे सिंग यांनी स्पष्ट केले.

कॅग, सीव्हीसीचे बळकटीकरण करावे : स्वराज
सरकारी धोरणे अयशस्वी होण्याचा ठपका ठेवण्याऐवजी कॅग, सीव्हीसीला बळकट करणे गरजेचे आहे, असे मत भाजपच्या लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी व्यक्त केले आहे. निरोगी लोकशाहीमध्ये अशा संस्थांना बळकट करणे आवश्यक आहे. यावर काम करण्याऐवजी अलीकडेच मी कॅग, सीव्हीसी संस्थांवरील टीका ऐकली. या संस्था विकासात अडथळा ठरू लागल्या आहेत, असे वक्तव्य करण्यात आले होते. ही विचारसरणी घातक आहे.

सरकारमधील सफाईसाठी पुढाकार घ्यावा : राष्ट्रपती
देशाच्या विकासामध्ये भ्रष्टाचाराचा मोठा अडथळा आहे, असे सांगून सीव्हीसीने सरकारमधील साफसफाईसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केले आहे. भ्रष्टाचाराचे उच्चटन करण्यास देशाला मर्यादित स्वरूपाचे यश आले आहे. भ्रष्टाचार हाच प्रगतीमधील मुख्य अडथळा आहे. भ्रष्टाचारामुळे व्यवहार खर्च वाढला आहे. सार्वजनिक सेवांच्या क्षमतेमध्ये घट निर्माण झाली आहे. जनतेसाठी असलेल्या सेवांपर्यंत नागरिकांची पोहोच कमी झाली आहे. त्यातून अन्याय वाढला आहे. असे ते म्हणाले.

सीबीआय संचालकांसह अधिकार्‍यांच्या झोपा
पंतप्रधान आणि राष्ट्रपती अधिकार्‍यांवरील अन्यायाबाबत बोलत असताना (वर) सीबीआय संचालक रणजित सिन्हा आणि केंद्रीय गृह सचिव अनिल गोस्वामी (टोपी घातलेले) यांच्यासह उपस्थित वरिष्ठ अधिकारी डुलक्या घेत होते.