आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • President Will Decide On Fate Of Delhi Assembly: SC

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निर्णय राष्ट्रपतींनी घ्यावा : न्यायालय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा बरखास्त करून पुन्हा निवडणूक घेण्यास काहीच हरकत नाही, परंतु त्याचा निर्णय राष्ट्रपतींनी घ्यावा, असे मत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी व्यक्त केले. याबाबत न्यायालय कोणतेही आदेश देणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. दिल्ली विधानसभा बरखास्त करण्याऐवजी निलंबित ठेवण्याच्या निर्णयाला आम आदमी पार्टीने आव्हान दिले होते. यासंबंधीच्याच याचिकेवर न्यायालयाने वरील मत प्रदर्शित केले आहे. ‘आप’चे नेते आणि दिल्लीचे माजी परिवहनमंत्री सौरभ भारद्वाज यांनी ही याचिका दाखल केली होती.

‘याबाबतचे निर्णय घेण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य राष्ट्रपतींना आहे. आम्ही फक्त कायदेशीरदृष्ट्या परिस्थिती विशद करू शकतो. याबाबत काय करायचे आणि कसे करायचे हे राष्ट्रपतींनी ठरवावे’ असे न्यायमूर्ती आर. एम. लोढा आणि कुरियन जोसेफ यांनी स्पष्ट केले.

‘न्यायालयाला फक्त घटनात्मक बाबींपर्यंत मर्यादित राहायचे आहे. या मुद्द्याच्या राजकीय बाबीत न्यायालयाला पडायचे नाही. परंतु विधानसभेत कामचलाऊ स्थिती निर्माण होईल असे करू नये,’ असेही या पीठाने सांगितले आहे. केजरीवाल सरकारने राजीनामा दिल्यानंतर विधानसभा स्थगित ठेवण्याचा केंद्राचा निर्णय अयोग्य असल्याचे याचिकेत म्हटले होते.

राजकीय परिस्थिती बदलू शकते: सरकारचे उत्तर
दिल्लीतील राजकीय घडामोडी कधीही बदलू शकतात. शिवाय अन्य पक्षांकडूनही सत्तास्थापनेचा दावा केला जाऊ शकतो. त्यामुळे विधानसभा बरखास्त करून निवडणूक घेणे अयोग्य असल्याचे सरकारने याबाबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. याप्रकरणी न्यायालयाने भाजप आणि काँग्रेस या पक्षांनी बाजू मांडण्यास सांगितले होते. या दोन्ही पक्षांनी सरकार स्थापन करण्यासारखी परिस्थिती नसल्याचे म्हटले होते.

यूपीएचा आणखी एक घोटाळा : ‘आप’चा आरोप
केंद्रीय पेट्रोलियममंत्री वीरप्पा मोईली हे एस्सार ग्रुपला बॉम्बे हायजवळील 130 किलोमीटर तेल क्षेत्र अत्यंत स्वस्त किमतीत देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे सरकारला 52 हजार कोटींचे नुकसान होणार असल्याचा आरोप आम आदमी पार्टी (आप) ने यूपीए सरकारवर लावला आहे. ‘आप’चे नेते प्रशांत भूषण यांनी हा आरोप केला आहे.