Home »National »Delhi» Presidential Poll Candidates Bjp Congress News

Inside Story : एप्रिलमध्येच लिहिली गेली होती दलित राष्ट्रपती बनवण्याची स्क्रिप्ट

दिव्य मराठी नेटवर्क | Jun 20, 2017, 15:08 PM IST

  • Inside Story : एप्रिलमध्येच लिहिली गेली होती दलित राष्ट्रपती बनवण्याची स्क्रिप्ट
नवी दिल्ली -बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा आश्चर्याचा धक्का दिला आहे. सर्व काही सुरळीत चालल्यास कोविंद हे नारायणन यांच्यानंतर देशाचे दुसरे दलित राष्ट्रपती ठरतील. वास्तविक, एप्रिलमध्ये नीती आयोगाची बैठक होती. त्याच वेळी भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत राष्ट्रपतिपदासाठी दलित चेहरा देण्याचे निश्चित झाले होते. कोविंद यांना राष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवून भाजपने दलित मतांवर डोळा साधला आहे. सोबतच विरोध करण्यासाठी विरोधी पक्षालाही संधी दिलेली नाही.
२४ एप्रिल रोजी दिल्लीत नीती आयोगाची बैठक झाली. त्यात सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आले होते. बैठकीच्या एक दिवस आधी २३ एप्रिल रोजीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची पक्ष कार्यालयात बैठक आमंत्रित केली होती. तेव्हाच सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली हाेती. मे महिन्यात केंद्र सरकारच्या तिसऱ्या वर्षपूर्तीनिमित्त पक्षाने धोरण आणि विचार गावोगावी पोहोचवण्याचा संकल्प केला. पक्षाने देशातील १५ टक्के दलित मतांवर डोळा ठेवत चर्चा केली. यात राष्ट्रपतिपद हासुद्धा प्रमुख मुद्दा होता. त्या महिन्यात कोविंद हे दिल्लीला गेले होते. त्यांनी मोदी, शहा आणि संघाच्या सर्वोच्च पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठीही घेतल्या. तेव्हाच कोविंद यांना सज्ज राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, याची माध्यमांत वाच्यता झाली नाही किंवा संघटनेच्या प्रमुख नेत्यांनाही त्याचा सुगावा लागू देण्यात आला नाही. कोविंद पंतप्रधानांच्या निमंत्रणावरून सोमवारी सायंकाळी दिल्लीकडे रवाना झाले. २३ जूनला ते नामांकन अर्ज दाखला करू शकतात.
कोविंद १९९१ मध्ये भाजपत आले. १९९४ मध्ये ते उत्तर प्रदेशातून पहिल्यांदा खासदार बनले. २००६ पर्यंत ते खासदार होते. पक्षाच्या तिकिटावर त्यांनी दोनदा निवडणूक लढवली; पण दोन्ही वेळा पराभूत झाले.
वडिलांनी शेती विकून शिकवले, आयएएसची नोकरी धुडकावून राजकारणात
कोविंद ५ वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. मोठी बहीण गोमतीदेवी यांनी पालनपोषण केले. पाच भाऊ आणि दोन बहिणींमध्ये ते सर्वांत लहान आहेत. वडील गावांत वैद्य होते. कानपूर विद्यापीठातून त्यांनी बी. कॉम. आणि एलएलबीची पदवी मिळवली. शिक्षणात हुशार असल्यामुळे वडिलांनी गावातील शेती विकून त्यांना पुढील शिक्षणासाठी दिल्लीला पाठवले.
अभ्यासासाठी गोदामालाच दिले स्टडी रूमचे स्वरूप
बालपणापासून कोविंद यांना अभ्यासात रुची होती. गोदामालाच त्यांनी स्टडी रुम बनवली होती. बहुतांश वेळ त्याच ठिकाणी राहायचे. शिक्षणासाठी शहरात गेले. वडिलांकडून पैसे मागवावे लागू नये म्हणून न्यायालयात स्टेनोची नोकरी केली.
थोरली बहीण स्वत: वाढायची तेव्हाच जेवायचे
थोरली बहीण तिच्या हाताने वाढायची तेव्हाच कोविंद जेवायचे. एकदा बहीण बाजारात गेली. कुटुंबातील सर्व जेवले पण कोविंद यांनी अन्नाचा कणही घेतला नाही. बहीण परतल्यानंतरच जेवले. तेव्हापासून बहीण कोविंद यांना जेवू घातल्याशिवाय बाहेर जायचीच नाही.
वडिलांसोबत जायचे पंचायतीत, वकिली व राजकारणात आले
बालपणी ते वडील मैकूलाल यांच्यासोबत पंचायतीत जायचे. यातूनच त्यांना वकिली आणि राजकारणाची प्रेरणा मिळाली. कोविंद यांनी पहिल्यांदा कानपूरच्या घाटमपूरमध्ये लोकसभा निवडणूक लढवली तेव्हा संपूर्ण गाव त्यांच्या पाठीशी होता.
संलग्न सेवेत निवड झाल्याने आयएएसची नोकरी नाकारली
नागरी सेवा परीक्षेत ते तिसऱ्या प्रयत्नात यशस्वी ठरले. पण मुख्य सेवेऐवजी संलग्न सेवेत निवड झाल्याने नोकरीच नाकारली. १९७१ मध्ये त्यांची बार कौन्सिल ऑफ दिल्लीसाठी नोंदणी झाली. सर्वोच्च व उच्च न्यायालयात १६ वर्षे वकिलीचा त्यांना अनुभव आहे.
माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे विशेष सचिव होते कोविंद, भाऊ चालवायचे किराणा दुकान
३० मे १९७४ रोजी सविता कोविंद यांच्याशी ते विवाहबद्ध झाले. कुटुंबात पत्नीसह एक मुलगा (प्रशांत) असून तो दिल्लीत व्यवसाय करतो. मुलगी स्वाती एअर इंडियात कार्यरत आहे. एक भाऊ झाशीत राहतो आणि अन्य कानपूरमध्येच काम करतात. त्यांचे भाऊ प्यारेलाल हे झिंझक या गावात किराणा दुकान चालवतात. कोविंद बालपणापासून संघाशी निगडित आहेत. १९७७ मध्ये ते माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे विशेष कार्यकारी अधिकारी होते.
अशी आहे दिनचर्या
संघाचे स्वयंसेवक असलेले कोविंद कायदेतज्ज्ञ आहेत. रात्री कितीही उशिरा झोपले तरी सकाळी ४ वाजता उठतात. रोज योग, साधना करतात. महिन्यात एकदा विपश्यना करतात. वाचन-लेखनाचा छंद आहे. बिहारमधील विद्यापीठांचे वेळापत्रक सुरळीत करण्याचे श्रेय त्यांनाच जाते.
धक्का - फसवणूक प्रकरणात नाव अाल्याने गेहलाेत ‘अाऊट’
नवी दिल्ली - खरे तर भाजपने केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलाेत यांनाच राष्ट्रपतिपदासाठी उमेदवारी देण्याचे यापूर्वी निश्चित केले हाेते. पंतप्रधान माेदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी तसे संकेतही गेहलाेत यांना दिले हाेेते. मात्र अचानक माेदींकडे गेहलाेत यांच्याविराेधातील फसवणुकीचे एक प्रकरण पाेहाेचले. बाेगस प्रमाणपत्र मिळवून अाणीबाणीची (मिसा बंदी) पेन्शन लाटल्याचे ते प्रकरण हाेते. या प्रकरणात गेहलाेत वादात अडकल्याने माेदी व शहा यांनी त्यांचा पत्ता कट केला. भाजपचे एक सरचिटणीस व एका केंद्रीय मंत्र्यानेही या शक्यतेला पुष्टी दिली अाहे.
उज्जैनच्या माधवनगर पाेलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, अाणीबाणीच्या काळात गेहलाेत फक्त १३ दिवस तुरुंगात हाेते, मात्र त्यांनी अाणलेल्या प्रमाणपत्रात ५४ दिवस ते तुरुंगात असल्याचा उल्लेख हाेता. या प्रकरणाची चाैकशी सहायक पाेलिस अायुक्तांमार्फत सुरू अाहे. पाेलिस संबंधित तुरुंगाची कागदपत्रांची तपासणीही करत अाहेत. विशेष म्हणजे या प्रकरणात ज्यांनी माेदींकडे तक्रार केली अाहे ते तक्रारदार स्वत: अाणीबाणीच्या काळात गेहलाेतसाेबत तुरुंगात हाेते, असा त्यांचा दावा अाहे.
मोदी-शहांच्या मास्टरस्ट्रोकमुळे विरोधक गोंधळात, २२ रोजी बैठक
भाजपचा विरोधकांशी संपर्क, चर्चेची शक्यता नाही
- भाजपचा निर्णय एकतर्फी आहे. अशा स्थितीत चर्चेची कोणतीही शक्यता नाही. विरोधी पक्ष २२ रोजी निर्णय घेईल.
- गुलाम नबी आझाद, काँग्रेस
विरोधकांच्या उमेदवारीनंतर पाठिंब्याबाबत निर्णय घेऊ
- दलित उमेदवाराची निवड चांगली. पाठिंब्याआधी विरोधक एनडीएपेक्षा मोठा दलित उमेदवार देतात का ते पाहू.
-मायावती, बसपा प्रमुख
आमच्या राज्यपालांची निवड अभिमानास्पद
- बिहारच्या राज्यपालांना राष्ट्रपतिपदाची उमेदवारी देणे अभिमानास्पद बाब आहे. लालू यादवांबरोबर चर्चा करून पाठिंब्याचे ठरवू.
- नितीशकुमार, मुख्यमंत्री, बिहार
देशात कोविंद यांच्यापेक्षाही मोठे दलित चेहरे
- भाजप दलित मोर्चाचे माजी अध्यक्ष असल्यानेच कोविंद यांची निवड. त्यांच्यापेक्षाही अनेक मोठे दलित आहेत.
-ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल
हेही वाचा...
2019 जिंकण्यासाठी बिहारमध्ये मोदींनी शाेधलेे यूपीचे ‘राम’नाथ, कोविंद यांचा विजय निश्चित
भाजपचे प्रवक्ते असूनही कधीच TV वर झळकले नाहीत: असे आहेत राष्ट्रपती पदाचे उमेदवार कोविंद
मोदींचे Tweet सांगतात, या 5 कारणांमुळे कोविंद बनले राष्ट्रपती पदाचे उमेदवार
DvM Analysis: राष्ट्रपतिपदासाठी दलित चेहरा मोदींचा मास्टरस्ट्रोक, ही आहेत 5 खरी कारणे...

Next Article

Recommended