नवी दिल्ली-
नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळाचा लवकरच विस्तार होईल या आशेवर असलेल्या आणि मंत्रीपदाची स्वप्ने पाहणा-यांचा तूर्त स्वप्नभंग झाला आहे. ज्यांची नावे मंत्रीमंडळासाठी सातत्याने येत होते अशांची मोदींनी स्थायी समित्यांवर वर्णी लावून शांत बसण्याचा सल्ला दिला आहे.
दोन दिवसांपुर्वी लोकसभा आणि राज्यसभेच्या स्थायी समित्या जाहीर करण्यात आल्यात. त्यात अहमदनगरचे भाजपचे खासदार दिलीप गांधी यांना सबऑर्डिनेट लेझीसलेशन समितीचे अध्यक्षपद, चंद्रपूरचे भाजपचे खासदार हंसराज अहिर यांना कोळसा व पोलाद तर शिवसेनेचे अमरावतीचे खासदार आनंदराव अडसुळ यांना रसायन व खते समितींचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. महाराष्ट्रातील हे तिनही खासदार मंत्रीपदाच्या शर्यतीत होते. केंद्रीय मंत्रीमंडळातील विस्तार झाल्यास या खासदारांचा शपथविधी शंभर टक्के होईल अशी त्या-त्या पक्षातील नेते खात्रीने सांगत सुटले होते. नरेंद्र मोदी यांचे अत्यंत विश्वासु जे. पी. नड्डा आणि राजीव प्रताप रुढी यांचाही पहिल्या टप्प्यातील मंत्रीमंडळात समावेश होण्याची शक्यता वर्तविली जात होती. ती संधी हुकल्याने विस्तारामध्ये त्यांचे नाव अग्रकमावर होते. परंतु मोदी यांनी रुढी यांना उर्जा स्थायी समितीचे तर नड्डा यांना मनुष्यबळ समितीचे अध्यक्ष केले. भाजपच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनुराग सिंग ठाकूर यांचीही तरुण मंत्री म्हणून चर्चा होत होती परंतु त्यांची अन्न व ग्राहक स्थायी समीतीच्या अध्यक्षपदावर बोळवण करण्यात आली आहे. मोदी यांच्या मंत्रीमंडळाचा तूर्तास तरी विस्तार होणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.