आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेच्या बहिष्काराने ‘स्मार्ट सिटी’चा शुभारंभ, काँग्रेसचे काळे झेंड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - स्मार्ट सिटीज मिशनअंतर्गत पुण्यातील १४ प्रकल्पांसह देशभरात विविध शहरांतील ६९ प्रकल्पांचा प्रारंभ शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यात झाला. मात्र, या भव्यदिव्य सोहळ्यावर भारतीय जनता पक्षाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने टाकलेला बहिष्कार या दोघांतील मतभेदांची दरी किती रुंदावली आहे, याची साक्ष ठरला.

दरम्यान, काँग्रेसनेही काळे झेंडे दाखवून जोरदार निदर्शने केली. राष्ट्रवादीचे पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांचे नाव निमंत्रण पत्रिकेवर नसल्याने उद््भवलेला वादही गाजला. महापौर सोहळ्याला उपस्थित होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर नेते व कार्यकर्त्यांनी शिवसेनेसारखा बहिष्कार टाकला. मनसे कार्यकर्तेही फिरकले नाहीत.

स्मार्ट सिटी म्हणजे विकासपर्व : गरिबी सामावून घेण्याची सर्वाधिक ताकद शहरांमध्ये आहे. त्यामुळे मागास भागांतून शहरांमध्ये स्थलांतर होते. म्हणूनच जास्तीत जास्त गरिबी सामावून घेण्याचे शहरांचे सामर्थ्य वाढवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. यातूनच समाजातील शेवटच्या घटकाला त्याचे जीवनमान उंचावण्याची संधी मिळेल आणि नवे विकासपर्व सुरू होईल, असे प्रतिपादन मोदी यांनी या वेळी केले. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात २० शहरे असून यात महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूर या दोन शहरांचा समावेश आहे.

एकत्र या : नायडू : नागरिकांचे जीवनमान सुरक्षित आणि सुखकर करणे हे स्मार्ट सिटीज् मिशनचे उद्दिष्ट असल्याचे सांगून शहरांचा विकास घडवण्यासाठी पक्षभेद बाजूला ठेवून सर्वांनी केवळ विकासाच्या झेंड्याखाली एकत्र यावे, असे आवाहन वेंकय्या नायडू यांनी केले.
मेक युवर सिटीज स्मार्टचे उद््घाटन
पंतप्रधान मोदी यांनी ‘मेक युवर सिटीज् स्मार्ट’ या स्पर्धेचे उद्घाटन केले. यात आपल्या शहराच्या नियोजनाबद्दल असलेल्या संकल्पना, आराखडा (डिझाईन) केंद्राला पाठवायचा आहे. सर्व नागरिकांसाठी ही स्पर्धा खुली आहे. पहिल्या तीन डिझाईन्सना 50 हजार ते दीड लाख रुपयांपर्यंतची रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. याशिवाय शहरांतील व्यावसायिक, तज्ज्ञांना एकत्र आणणाऱ्या स्मार्ट नेट या ऑनलाईन संपर्क यंत्रणेचे उद््घाटनही मोदींनी केले.

राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू, राज्यमंत्री बाबुल सुप्रियो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट, खासदार अनिल शिरोळे, महापौर प्रशांत जगताप आदी यावेळी उपस्थित होते. स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी देशातील शंभर शहरांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र अव्वलच असेल
शहरीकरण हे आव्हान नव्हे, संधी समजले पाहिजे. स्मार्ट सिटीज् मिशनमुळे परिवर्तन येणार आहे. धनिकांना सुविधा मिळतात. परंतु, गरिबांना मिळत नाहीत. ही त्रुटी या प्रकल्पात दूर होईल. पायाभूत सुविधा, युवकांना रोजगार व सामान्यांचे जीवनमान उंचावणारे हे मिशन आहे. ‘स्मार्ट सिटी’ असो की ‘अमृत सिटी’ महाराष्ट्र यात सदैव आघाडीवर राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

परदेशात नागरिक स्मार्ट
भारतात यापूर्वीच्या सरकारांनी यासाठी निधी दिला नाही, असे अजिबात नाही. तरीही आपल्यानंतर स्वतंत्र झालेले जगातील कितीतरी देश आपल्यापुढे निघून गेले. आर्थिक दारिद्र्यातून त्यांनी प्रगती साधली. याबाबत माझ्या मनात सतत मंथन सुरू असते. तेव्हा लक्षात आले, की पंचायत ते पंतप्रधानांपर्यंत सरकारात बसलेल्या बाबूंपेक्षा या देशांचा नागरिकच अधिक स्मार्ट आहे. भारतात सव्वाशे कोटी जनतेची ताकद अशा कामासाठी एकवटली तर हा देशही वेगाने वाटचाल करेल. त्यामुळे स्वच्छता अभियान, स्मार्ट सिटी यासारख्या संकल्पनांचे रुपांतर जनआंदोलनात व्हायला हवे, असे मोदी म्हणाले.

गरीबांना सामावून घ्या
इमारतींची उंची आणि रस्त्यांच्या आकारांवरून शहराचे मोजमाप होत नाही. प्रत्येक शहराला स्वतःचा आत्मा असतो. स्वतःची ओळख, सौंदर्य आहे. हा आत्मा कायम ठेवून त्याला नवी उर्जा देण्याचे काम करायचे आहे. सरकारी योजनांमुळे देश पुढे जात नाही तर जनतेच्या आकांक्षांमुळे देशाची प्रगती होते. म्हणूनच प्रत्येक शहरवासीयाने आपले शहर आर्थिक विकासाचे केंद्र बनवण्याचे आव्हान स्विकारले पाहिजे. जेवढ्या गरिबांना शहरे सामावून घेतील तेवढा शहरांचा अधिक विकास होईल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

क्रिकेट सामना असो-नसो, मैदानांना पाणी लागतेच!
दुष्काळग्रस्त भागांत आयपीएलचे सामने नकोत म्हणून दाखल याचिकांच्या मुद्यावर न्यायालय किंवा याचिकाकर्त्यांचा स्पष्ट उल्लेख न करता मोदी म्हणाले, “सामने असोत किंवा नसोत, क्रिकेटच्या मैदानांना रोज पाणी मारावेच लागते.’ कधी-कधी माध्यमे एखादा विषय इतका वाजवतात की आपण मग क्रिकेटही खेळू शकत नाहीत, असेही मोदी म्हणाले. सामने इतरत्र हलवले म्हणून महाराष्ट्रालाही महसुलात फटका सहन करावा लागल्याचा उल्लेख त्यांनी केला.

देवेंद्र बोलले, महापौर आले
पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांचे नावच निमंत्रण पत्रिकेत नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसही जाम भडकली. मात्र, ऐनवेळी महापौर कार्यक्रमाला उपस्थित असल्याचे दिसले. मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांशी याबाबत केलेल्या चर्चेनंतर ते आल्याचे स्पष्ट झाले.
हा तर संकुचित विचार : पवार
ज्यांच्या नावे निमंत्रण पत्रिका हवी त्या पुण्याच्या महापौरांचेच नाव निमंत्रण पत्रिकेत नाही. हा संकुचितपणाचा विचार आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी माझ्याशी चर्चा केल्यानंतर महापौर कार्यक्रमाला उपस्थित राहिले.- शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष
पहल्या टप्प्यात ही शहरे होणार स्मार्ट सिटी
1. भुवनेश्वर
2. पुणे
3. जयपुर
4. सूरत
5. कोचि
6. अहमदाबाद
7. जबलपुर
8. विशाखापट्टनम
9. सोलापुर
10. डावंगेरे
11. इंदूर
12. न्यू दिल्ली
13. कोईबंतूर
14. ककिनाडा
15. बेलगाव
16. उदयपूर
17. गुवाहाटी
18. चेन्नई
19. लुधियाना
20. भोपाळ
पुढील स्लाइडमध्ये वाचा,
>> गुन्हेगार रस्त्यावर येताच वाजेल अलार्म
>> काय-काय असेल स्मार्ट सिटीमध्ये

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...