आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prime Minister Narendra Modi Launched Give It Up Campaign

अगोदर महागाईला आवर घाला, तरच सबसिडी सोडू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - घरगुती गॅस सिलिंडरवर दिली जाणारी सबसिडी श्रीमंतांनी स्वत:हून नाकारावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार करत आहेत. मात्र, "अगोदर महागाई तरी कमी करा. मगच या आवाहनावर विचार करता येईल,' अशी जनतेची भावना आहे. सध्याच्या महागाईत घरखर्च चालवणेही कठीण असल्याचे या लोकांचे म्हणणे आहे.

गॅस सबसिडी काही लोकांनी नाकारली तर जो पैसा वाचेल त्यातून दुर्गम भागांतील लोकांना स्वयंपाकाचा गॅस पुरवता येईल. शिवाय जनहिताची कामेही करता येतील, असे पंतप्रधानांचे म्हणणे आहे. यावर मोदी यांनी लोकांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा सरकारने महागाई कमी करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, असे म्हणणे मांडले.
फायदा कोण सोडेल?

रेल्वेचा एक कर्मचारी म्हणाला, महागाईच्या या जमान्यात गॅस सबसिडीमधून थोडा दिलासा मिळतो तो कोण सोडेल? ही महागाईच एवढी आहे की अशा थोड्याथोडक्या बचतीचाही विचार कुणी करू शकत नाही.

सरासरी अडीच हजारांची सबसिडी : सरकार वर्षाकाठी १४.२ किलोचे १२ किंवा ५ किलोच्या ३४ सिलिंडरवर सबसिडी देते. दिल्लीत १४.२ किलो सिलिंडरची किंमत ४१७, तर विनाअनुदानित सिलिंडरची किंमत ६२१ रुपये आहे. याचा हिशेब लावला तर १२ सिलिंडरवर एका कुटुंबाला साधारणपणे २,४५० रुपयांची सबसिडी मिळते.

१५.३ कोटी स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे देशात ग्राहक आहेत. त्यापैकी २ लाख ८० हजार ग्राहकांनी सबसिडी स्वत:हून नाकारली.

महागड्या कर्जामुळे उत्पादन क्षेत्रात गुंतवणूक घटली : जानेवारी आणि मार्च महिन्यात रेपो दरात अर्धा टक्का कपात करूनही बँकांचे व्याजदर बदललेले नाहीत. कंपन्या अजूनही ९.५ ते १४.७५ टक्के व्याज फेडत आहेत. या महागड्या व्याजदरामुळे उत्पादन क्षेत्रात गुंतवणूक घटली असल्याचे "फिक्की'ने आपल्या अहवालात नमूद केले आहे.

मंगळवारी पतधोरण आढावा
रिझर्व्ह बँक मंगळवारी पतधोरणाचा वार्षिक आढावा घेणार आहे. मात्र, या आढाव्यात रेपो दर कमी केला जाण्याची शक्यता कमी आहे. अवकाळी पावसामुळे अन्नधान्याचे वाढलेले भाव हे यामागचे प्रमुख कारण आहे. भविष्यात रिझर्व्ह बँक ही महागाई कमी करण्यासाठी व्याजदरांत कपात करू शकते.

महागाई आहे तिथेच, आकडे फसवे
अनेक महिलांनी स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरवरील सबसिडीबाबत बोलताना "अगोदर महागाई तरी कमी करा,'असे आवाहन केले. यावर महागाईचा दर सध्या शून्य टक्के असल्याचे या महिलांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. तेव्हा हे आकडे फसवे असल्याचे मत महिलांनी व्यक्त केले.