आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prime Minister Narendra Modi Starts Swacha Bharat Abhiyan

स्वच्छ भारत अभियान: मोदींच्या मंचावर अमिर, सचिन-सलमानला सहभागी होण्याचे आवाहन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र - पंतप्रधान नरेंद्र मोदी हातात झाडू घेऊन स्वच्छता करताना.)
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गांधी जयंतीनिमीत्त त्यांची महत्त्वाकांक्षी योजना 'स्वच्छ भारत अभियान' ची इंडिया गेट येथून सुरुवात केली आहे. या अभियानाला राजकारणाशी जोडू नये, हे राष्ट्रभक्तीचे कार्य असल्याचे ते म्हणाले. 2019 पर्यंत भारताला आपल्याला स्वच्छ देश म्हणून जगासमोर आणायचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी स्वच्छतेची शपथ दिली. या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि सरकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चित्रपट अभिनेता आमिर खान देखील स्वच्छ भारत अभियानमध्ये सहभागी झाला. यावेळी मंचावर केंद्रीय शहर विकासमंत्री व्यंकय्या नायडू आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.

पंतप्रधानांनी क्रिकेटर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर व अभिनेता सलमान खान, काँग्रेस नेते शशी थरुर, उद्योगपती अनिल अंबानी यांच्यासह नऊ जणांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहान केले. ते म्हणाले, 'स्वच्छता राखणे ही काही फक्त स्वच्छता कर्मचार्‍यांची जबाबदारी नाही, तर प्रत्येक भारतीयाने यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.' मी कचरा करणार नाही, आणि मी कचरा करु देणार नाही, अशी शपथ त्यांनी सर्वांना दिली.

पंतप्रधान मोदी म्हणाले, 'आज महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्रींचे आपण स्मरण करतो. शास्त्रीजींनी देशाला 'जय जवान-जय किसान'चा नारा दिला. त्यानंतर शेतकर्‍यांनी देशाची धान्याची कोठारे भरुन टाकली. महात्मा गांधींनी 'क्विट इंडिया-क्लिन इंडिया'ची घोषणा केली होती. त्यांचे क्लिन इंडियाचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. ते आपल्याला पूर्ण करायचे आहे.'

सर्व सरकार आणि सामाजिक संस्थांचे कार्य महत्त्वाचे
देश स्वातंत्र्य झाल्यापासून आतापर्यंतच्या अनेक सरकारांनी देशात स्वच्छतेचे काम केले आहे. त्यांचे काम नाकारता येणार नाही, असे सांगत पंतप्रधान मोदींनी आधीच्या सरकारच्या कामाचा गौरव केला. सर्वोदय संघटना आणि सेवादलाचा उल्लेख करुन ते म्हणाले, देशातील अनेक सामाजिक, सांस्कृतिक संघटनांनी या क्षेत्रात काम केले आहे. ते उल्लेखनिय आहे. अनेक सेवाभावी संस्था हे काम करत आहेत. त्यांची देखील या अभियानात मदत घ्यावी लागणार असल्याचे ते म्हणाले.

स्वच्छ भारत अभियानाची औपाचरिक सुरवात करण्याआधी पंतप्रधानांनी गुरुवारी सकाळी दिल्लीतील वाल्मिकी मंदिर येथील वस्तीत जाऊन तिथे झाडू हातात घेऊन रोड स्वच्छ केला. येथे येण्याआधी मोदींनी मंदिर मार्ग पोलिस स्टेशनमध्ये अचानक भेट देऊन पाहाणी केली. मोदींनी दिवसाची सुरवात राजघाट आणि विजयघाट येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना आदरांजली अर्पण केली.
पोलिस स्टेशनची पाहाणी
'स्वच्छ भारत अभियान'ची औपचारिक सुरवात करण्याआधी पंतप्रधान मोदी मंदिर मार्ग पोलिस स्टेशनमध्ये गेले. तिथे त्यांनी पोलिस स्टेशन मधील स्वच्छतेची पाहाणी केली.

महात्मा गांधींना आदरांजली
पंतप्रधान गुरुवारी सकाळी राजघाटावर पोहोचले आणि महात्मा गांधींना आदरांजली अर्पण केली. तेथून ते विजयघाट येथे गेले आणि लालबहादूर शास्त्री यांना श्रद्धांजली अर्पण केली.
पंतप्रधानांनी घेतला हातात झाडू
स्वच्छ भारत अभियानाची औपचारिक सुरवात करण्याआधी पंतप्रधान मोदी मंदिर मार्गावरील वाल्मिकी मंदिर परिसरात गेले. येथे स्वच्छता अभियानात सहभागी झाले. त्याचवेळी पंतप्रधानांसह अनेक केंद्रीय मंत्री देशातील विविध शहरांमध्ये हातात झाडू घेऊन स्वच्छतेचा संदेश देत आहेत. शासकीय कर्मचारी देखील या अभियानात सहभागी होणार आहेत. जवळपास 30 लाख कर्मचारी स्वच्छतेची शपथ घेतील.

पुढील स्लाईडवर वाचा, स्वच्छतेची शपथ देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी... आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनीही हातात घेतला झाडू....