नवी दिल्ली - मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पदावरील गंडांतर तूर्त टळल्याचे चित्र आहे. चव्हाण यांनी शनिवारी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, त्यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल, गुलाम नबी आझाद यांची भेट घेतली. नंतर आपला राजीनामा घेतला जाणार नसल्याचे त्यांनी सूचकपणे सांगितले.
काही दिवसांपासून नेतृत्वबदलाची चर्चा व घडामोडींना वेग आला होता. त्यातच मुख्यमंत्री चव्हाण यांनी शनिवारी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेऊन विधानसभा निवडणुकीवर चर्चा केली. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनाही ते भेटले. सोमवारनंतर राहुल गांधी यांची ते भेट घेण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र सदनातील पत्रकारांसोबत अनौपचारिक चर्चेत चव्हाण यांनी खांदेपालटाच्या प्रश्नावर थेट उत्तर न देता विधानसभा निवडणूक आपल्याच नेतृत्वाखाली लढवली जाणार असल्याचे सांगितले. केंद्रीय देखरेख समिती 28 जूनला राज्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
28 जूनला दिल्लीत बैठक
निवडणुका असलेल्या राज्यांत ए.के.अँटनी व समितीतील सदस्य जाणार आहेत. परंतु महाराष्ट्रात जाण्याबाबत त्यांना सूचना नाहीत. राज्यातील निवडणुकीवर येत्या 28 जून रोजी दिल्लीत आढावा बैठक होत आहे, असे चव्हाण म्हणाले. सोनियांसोबत विधानसभा निवडणुकीसंदर्भातच चर्चा झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी कॉँग्रेससोबतची आमची आघाडी ही मजबूत असून त्यात खिंडार पडणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याशिवाय आपण राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची सदिच्छा भेट घेतली असल्याचे मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले.
मुख्यमंत्री बदलाच्या बातम्या येत असल्या तरी श्रेष्ठींकडून
याबाबत मला सूचना नाहीत. आतापर्यंत प्रत्येक जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडली; यापुढेही असेच धोरण असेल. - पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री
निवडणुकीच्या तोंडावर, मुख्यमंत्री फासावर
1999 जोशींच्या जागी राणे
जावयाला भूखंड दिल्याचे शुक्लकाष्ठ लागले व 3 वर्षे 10 महिने मुख्यमंत्री राहिलेल्या मनोहर जोशी यांना शिवसेनेने बाजूला केले व नारायण राणे यांना 1999 मध्ये मुख्यमंत्री केले. पण विधानसभा निवडणूक सहा महिने आधीच झाल्याने राणेंना 6 महिने मिळाले.
परिणाम काय : नेतृत्व बदलूनही युतीच्या हातची सत्ता गेलीच.
2003 देशमुखांऐवजी शिंदे
तीव्र नाराजीमुळे विलासराव देशमुखांच्या नेतृत्वात निवडणुका जिंकण्याची काँग्रेस नेत्यांना खात्री नव्हती. 3 वर्षे 3 महिने पदावर राहिलेल्या विलासरावांच्या जागी दिल्लीहून सुशीलकुमार शिंदे आले. जानेवारी 2003 ते ऑक्टोबर 2004 असे दीड वर्ष शिंदे होते.
परिणाम काय : सत्ता काबीज, पण राष्ट्रवादीची ताकद वाढली. शिंदेंची रवानगी आंध्रच्या राज्यपालपदी.