आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priyanka Gandhi Contest From Varanasi Lok Sabha Seat

वाराणसीतून मोदींविरोधात प्रियंका गांधींना तिकीट द्या, काँग्रेसच्या एका गटाची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - वाराणसी येथून नरेंद्र मोदी विजयी होणारच या भाजपच्या विश्वासाला तडा देण्याची जय्यत तयारी काँग्रेसमध्ये सुरु आहे. भाजपला वाटत तेवढा येथून मोदींचा विजय सोपा असणार नाही. काँग्रेस त्यांना येथून कडवी झुंज देण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी पक्षामध्ये वेगवेगळ्या पर्यायांवर काथ्याकूट सुरु आहे. आतापर्यंत काँग्रेसचे अनेक नेते निवडणूक लढण्यास इच्छूक नव्हते मात्र, बुधवारी अचानक त्यांच्यात उत्साह निर्माण झाला आहे. काँग्रेसच्या एका मातब्बर गटाने वाराणसीतून मोदींविरोधात प्रियंका गांधी यांना निवडणूकीच्या मैदानात उतरवण्याची मागणी केली आहे. या गटाचे म्हणणे आहे, की मोदींना पराभूत करायचे असेल तर, प्रियंका यांना लोकसभेचे तिकीट दिले पाहिजे. दुसरीकडे दिग्विजयसिंह यांचेही नाव समोर आले आहे.
स्थानिक समीकरण आणि मोदींना शह देण्यासाठी काय करता येईल, यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांशी सल्लामसलत केली आहे. या जागेबाबतचा अंतिम निर्णय शुक्रवारी होण्याची शक्यता आहे. या जागेवरुन पक्षाचे महासचिव मोहन प्रकाश, माजी खासदार राजेश मिश्र आणि आमदार अजय राय यांच्या नावाचीही चर्चा आहे.
काँग्रेस केजरीवाल यांना समर्थन देणार नाही
मोदींना कोणत्याही परिस्थितीत वॉकओव्हर द्यायचा नाही, असा निश्चय काँग्रेसने केला आहे. या जागेवरून तगडा उमेदवार उभा करणार असल्याचे पक्षाने सांगितले. वाराणसीत पूर्ण शक्ती पणाला लावणार असल्याचे प्रवक्ते आनंद शर्मा म्हणाले. तसेच कोणत्याही परिस्थितीमध्ये अरविंद केजरीवाल यांना समर्थन देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक पर्यायावर काँग्रेसचा गांभार्याने विचार
प्रियंका गांधी
कारण - प्रियंका अनेक वर्षांपासून उत्तरप्रदेशमध्ये सक्रिय आहेत. अमेठी आणि रायबरेली येथे त्यांचे नेहमी येणे-जाणे असते. त्यांना वाराणसीतून तिकीट दिले तर, पक्षातही उत्साह निर्माण होईल. तसेच पूर्वांचलमधील मोदी प्रभावाला ब्रेक लावण्यातही त्यांची उमेदवारी परिणामकारक ठरले अशी पक्षाला आशा आहे. कार्यकर्तेही एकजूट होऊन काम करतील. समाजवादी पक्षही त्यांचा उमेदवार मागे घेण्याची शक्यता आहे.
दिग्विजसिंह
कारण - मोदींच्या विरोधात वक्तव्ये करण्यास आघाडीवर असणारे काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह वाराणसीमधून निवडणूक लढवू शकतात. सूत्रांच्या मते त्यांच्या नावाला उत्तरप्रदेशमधील सत्ताधारी समाजवादी पक्षाचाही पाठिंबा मिळवला जाऊ शकतो. दिग्विजय मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री होते. 10 वर्षांपासून त्यांनी निवडणूक लढवलेली नाही. त्यांना वाराणसीमध्ये ठाकूर समाजाचे समर्थन मिळू शकते, अशी काँग्रेसला आशा आहे. ते साधू-संतांबरोबरही चर्चा करू शकतात.