आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- तुमच्या मनात महिलांबाबत आदरभाव नसेल तर सैन्य दलात रुजू होण्याची तुमची इच्छा आणि पात्रता असूनही तुमची निवड केली जाणार नाही. सैन्य दलाने आपल्या भरती प्रक्रियेत बदल करत अर्ज करणार्या उमेदवारांच्या मनात स्त्रियांबाबतची प्रतिमा जाणून घेण्यासाठी भरती प्रक्रियेत मानसिक चाचणीचाही अंतर्भाव करण्याचा निर्णय घेतला आहे. एखादा उमेदवार भरतीच्या इतर निकषांत बसत असेल. मात्र, महिलांबाबत त्याचे विचार नकारात्मक असतील, तर त्याची निवड होणार नाही.
सैन्यातील अधिकारी आणि जवानांमध्ये महिलांबाबत कोणतीही नकारात्मक भावना असू नये, तसेच समाजातील सैन्य दलाची प्रतिमा ‘महिला व मुलींबाबत संवेदनशील’ अशी तयार व्हावी, असाच या निर्णयामागचा हेतू आहे. या उद्देशानेच प्रोजेक्ट गरिमा राबवण्यात येत असल्याची माहिती एका अधिकार्याने दिली. सैन्यात भरती होणारे 80 टक्के उमेदवार ग्रामीण किंवा निमशहरी असतात. त्यांच्या मनात जर महिलांबाबत हिंसक किंवा भेदभावजनक विचार असतील, तर सैन्यातील एकूण वातावरणावर त्याचा विपरीत परिणाम होईल, हे लक्षात घेऊन असा निर्णय घेण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले. महिलांबाबत समाजात नुकत्याच घडलेल्या काही घटनांमुळे सैन्य दलही सतर्क झाले आहे.
प्रदीर्घ काळ कामावर तैनात असल्यामुळे जवानांवर शारीरिक किंवा मानसिक ताण येऊ नये, सैनिकांच्या वर्तनावर त्याचा परिणाम होऊ नये, यासाठी विशेष समुपदेशन यंत्रणाही विकसित केली जाणार आहे. सुटीच्या काळात एखादा सैनिक महिलांबाबत गैरवर्तन करेल, अशी शंका असलेल्या सैनिकांबाबत विशेष काळजी घेऊन समुपदेशन करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली.
पोषक वातावरण
सैनिकांच्या मुलींनी सैन्य दलात रुजू होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगावी, तसेच मुलींना उच्च शिक्षण देण्यास सैनिकांना प्रेरणा मिळावी, असे पोषक वातावरण व्हावे यासाठी हा बदल केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कार्यरत कर्मचार्यांबाबत ‘झीरो टॉलरन्स धोरण’
महिला अत्याचारप्रकरणी सैन्य दलाने आता ‘झीरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार आता सैन्यात कार्यरत नागरिकांना घरी तसेच घराबाहेरही महिलांचा आदर ठेवावाच लागेल. बहुतांश ठिकाणी आढळून येणारी महिला किंवा मुलीवर वचक ठेवण्याची मानसिकता सोडून द्यावी लागेल. एका विशेष कार्यक्रमांतर्गत सैन्य दलात कार्यरत कर्मचार्यांमध्ये लिंगभेदाबाबतही जागृती केली जात असल्याचे सांगण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.