आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रौढ व्यक्तीही ब्ल्यू व्हेल चॅलेंज गेमच्या जाळ्यात का अडकताहेत? दिल्‍ली हायकोर्टाचा प्रश्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ‘ब्ल्यूव्हेल गेम चॅलेंज’ या इंटरनेट गेमच्या जाळ्यात अडकून मुले आत्महत्या करत असल्याच्या वृत्ताबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी चिंता व्यक्त केली. मुले या जाळ्यात अडकत आहेत हे समजू शकते, पण प्रौढ व्यक्तीही या गेमच्या जाळ्यात कसे काय अडकत आहेत, असा प्रश्नही उच्च न्यायालयाने उपस्थित केला.

ब्ल्यू व्हेल गेमच्या लिंक्स काढून टाकण्याचे निर्देश गुगल, फेसबुक आणि याहू या इंटरनेट कंपन्यांना द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. त्यावर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती गीता मित्तल आणि न्यायमूर्ती सी. हरी शंकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. खंडपीठाने या प्रकरणी कुठलाही आदेश दिला नाही. या गेममध्ये अंगावर जखमा करून घेणे, आत्महत्या करणे असे टास्क दिले जातात. लहान मुले या गेमच्या प्रभावाखाली येऊ शकतात, पण प्रौढ व्यक्तीही त्यात कसे काय अडकू शकतात?असा प्रश्न खंडपीठाने विचारला. ‘एखाद्या प्रौढाला एखादे टास्क दिले जाते, त्याने किंवा तिने इमारतीवरून उडी का मारावी? मुले आणि प्रौढ व्यक्तीही असा प्रकार करत आहेत याचे आश्चर्य वाटते’, अशी टिप्पणी खंडपीठाने केली.
 
ब्ल्यू व्हेल गेमच्या लिंक डाउनलोड करण्याबाबत सरकारने कुठला बंदी आदेश जारी केला आहे का, अशी विचारणा खंडपीठाने केली. दिल्लीत अशी काही घटना घडली आहे का, असा प्रश्न खंडपीठाने याचिकाकर्ते अॅड. गुरमीत सिंग यांना विचारला आणि या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ ऑगस्टला ठेवली. ब्ल्यू व्हेल चॅलेंज या इंटरनेट गेमच्या लिंक्स तत्काळ काढून टाकाव्यात, असा आदेश इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने दोन दिवसांपूर्वीच गुगल, फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, मायक्रोसॉफ्ट आणि याहू या इंटरनेट कंपन्यांना दिला होता.
 
या प्रकरणी बुधवारी एक जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. भारतात आणि विदेशातही या गेमच्या प्रभावामुळे मुले आत्महत्या करत अाहेत, असा दाखला देत याचिकाकर्ते अॅड. गुरमीत सिंग यांनी, ब्ल्यू व्हेल चॅलेंजशी संबंधित कुठलेही मटेरियल अपलोड करण्यास प्रमुख इंटरनेट कंपन्यांना बंदी घालावी, अशी मागणी केली होती. या कंपन्या न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत आहेत की नाहीत यावर देखरेख करण्यासाठी पाच सदस्यांची समिती स्थापन करण्याचे निर्देश दिल्ली पोलिसांना द्यावेत, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली होती. ‘ब्ल्यू व्हेल चॅलेंजमुळे आपल्या जिवावर बेतेल आणि कुटुंबीयांना मोठा फटका बसेल, याची जाणीवही त्यांना नाही, असे याचिकेत नमूद केले होते.
 
भारतात दोन आठवड्यांत मुलांचा बळी
यागेममुळे भारतात दोन आठवड्यांच्या कालावधीत १२ ते १९ वर्षे वयोगटातील मुलांचा मृत्यू झाला आहे. रशिया, चीन, सौदी अरेबिया, ब्राझील, अर्जेंटिना, बल्गेरिया, चिली आणि इटली यांसारख्या देशांतही किशोरवयीनांच्या मृत्यूचे प्रकार घडले आहेत,असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...