आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प अंतिम मंजुरीसाठी कॅबिनेटकडे : बापट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठवण्यात अाला अाहे, अशी माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षणमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी दिल्लीत दिली.
पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पासंदर्भात शुक्रवारी केंद्रीय अर्थ मंत्रालयात बापट व केंद्रीय अर्थ सचिव अशोक लवासा यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. त्यात पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डाच्या (पीआयबी) वतीने हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस केंद्रीय नगरविकास मंत्रालयाचे सचिव राजीव गौबा, राज्याच्या महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पुणे महापालिकेचे आयुक्त कुणालकुमार आणि महाराष्ट्र सदनाचे गुंतवणूक तथा राजशिष्टाचार आयुक्त लोकेश चंद्र उपस्थित होते.
बापट यांनी सांगितले की, ‘पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्यात १२ हजार २९८ कोटी रुपये खर्च येणार आहे. केंद्र आणि राज्य शासन यातील प्रत्येकी २० टक्के निधी देणार आहे. यानुसार केंद्र शासन २ हजार ११८ कोटी तर राज्य शासन २ हजार ४३० कोटींचा निधी देणार आहे. सुमारे एक हजार २७८ कोटींचा एकूण १० टक्के निधी हा पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका उभारणार आहेत. उर्वरित ६ हजार ३०५ कोटींचा ५० टक्के एवढा निधी कर्जाच्या माध्यमातून उभारला जाणार अाहे.’
पुणे मेट्रोचे २ कॉरिडॉर असतील. कॉरिडॉर-१ हा पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट असा १६.६ किमीचा असणार आहे. यातील पाच किमी अंतर हे भुयारी असेल आणि या मार्गावर एकूण १५ स्थानके असतील. कॉरिडॉर-दाेन हा कोथरूड भागातील वनज येथून एरवडा भागातील रामवाडीपर्यंत १४.७ किमी अंतराचा असेल. या मार्गावर एकूण १६ स्थानके असणार आहेत. कॉरिडॉर-दाेनचा पूर्ण मार्ग जमिनीवरून असेल. पुणे व पिंपरी चिंचवड या महापालिकांच्या मंजुरीनंतर राज्य व केंद्र शासनाने या प्रकल्पास मंजुरी दिली अाहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) पुणे मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून मेट्रोचे दाेन कॉरिडॉर शहरासाठी प्रस्तावित केले असून त्यास मान्यता मिळाली असल्याचे बापट यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...