आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय मंत्र्यांच्या पत्नी इन्फोसिसच्या संचालकपदी, सोशल मीडियावर वादात्मक चर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - पुनिता सिन्हा आणि जयंत सिन्हा. - Divya Marathi
फाइल फोटो - पुनिता सिन्हा आणि जयंत सिन्हा.
नवी दिल्ली - देशातील अग्रगण्य सॉफ्टवेअर कंपन्यांपैकी एक असलेल्या इन्फोसिसने डॉ. पुनीता कुमार सिन्हा यांची स्वतंत्र संचालकपदी नियुक्ती केली आहे. स्थापित गुंतवणूकदार म्हणून ओळख असलेल्या डॉ. सिन्हा या मोदी सरकारमधील वित्त राज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्या पत्नी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी वित्त मंत्री यशवंत सिन्हा यांच्या स्नूषा आहेत.
५३ वर्षीय पुनीता यांनी अमेरिकेच्या कित्येक अग्रगण्य कंपन्यांसोबत काम केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील फंड मॅनेजमेंटमध्ये त्यांना २५ वर्षांपेक्षा अधिक अनुभव आहे. एस. के. एस. मायक्रो फायनान्स आणि शोभा लिमिटेडसारख्या अव्वल कंपन्यांच्या संचालकीय मंडळातही त्यांनी काम केले आहे. शिवाय पॅसिफिक पॅराडायम अॅडव्हाझर्स या स्वतंत्र सल्लागार आणि व्यवस्थापन कंपनीच्या त्या संस्थापक तसेच व्यवस्थापकीय संचालक आहेत. यापूर्वी ब्लॅकस्टोन समूहाच्या वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक पदावर असताना त्यांनी अब्जावधींचे पोर्टफोलिओ सांभाळले आहेत. २०१५ मध्ये या समूहाने २० लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याच्या संपत्तीचे व्यवस्थापन सांभाळले होते. १४ जानेवारीपासून पुनीता इन्फोसिसच्या संचालकपदी रुजू झाल्या आहेत.

आयआयटी दिल्लीत जयंत सिन्हांशी भेट
पेनसिल्व्हानिया विद्यापीठाच्या व्हार्टन स्कूलमधून फायनान्समध्ये पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर पुनीता यांनी दिल्लीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलॉजीमधून केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली. याच वेळी त्यांची जयंत सिन्हा यांच्याशी भेट झाली.
सोशल मीडियावर नियुक्तीवरून चर्चा
इन्फोसिसच्या संचालक मंडळात पुनीता यांच्या नियुक्तीमुळे सोशल मीडियावरील चर्चेला उधाण आले आहे. केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांच्या पत्नी असल्यामुळेच त्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे काहींचे म्हणणे आहे. काही नेटिझन्सनी याची तुलना संपुआ सरकारमधील अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या पत्नी नलिनी चिदंबरम यांची आयकर विभागाच्या वकीलपदी नियुक्ती केल्याच्या प्रकरणाशी केली आहे. तेव्हाही मोठा वाद निर्माण झाला होता. दरम्यान, डॉ. सिन्हा यांची जयंत सिन्हा यांच्या पत्नी म्हणून नव्हे, तर एक प्रसिद्ध गुंतवणूकदार म्हणून ओळख आहे, असे काही लोकांचे म्हणणे आहे.