आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली - काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला केला. सीआरपीएफचे पाच जवान शहीद झाले. ते फक्त लोकांच्या दृष्टिकोनातून आणि वृत्तपत्रांच्या शीर्षकांमध्ये, सरकारी दस्तऐवजात नाही. सरकार देशाच्या शत्रूविरुद्धच्या लढाईत मृत्युमुखी पडणा-या निमलष्करी - केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या (सीएपीएफ) जवानांना शहिदांचा दर्जा देत नाही. तशी मागणी अनेकदा झाली आहे. मात्र लष्कराच्या विरोधामुळे सन्मानाची ही लढाई अहंकारापायी संघर्षाच्या पातळीवर उतरली आहे.
शहीद केवळ लष्कर, हवाई दल आणि नौदलाचे जवानच होतात. सीआरपीएफ, बीएसएफ, सीआयएसएफ, आयटीबीपी, एसएसबी आणि आरपीएफच्या जवानांचा फक्त मृत्यू होतो. सरकारी गॅझेटमध्ये संरक्षण दलाच्या जवानांसाठी शहिदांच्या दर्जाची अधिसूचना आहे. म्हणजेच काश्मिरात दहशतवाद्यांशी चकमक झाली, त्यात लष्कर आणि सीआरपीएफ दोघांचेही जवान मारले गेले तर लष्कराच्या जवानाला शहीद म्हटले जाईल. मागील तीन वर्षांमध्ये लष्कराचे सुमारे 400 जवान शहीद झाले आहेत, तर निमलष्करी दलाच्या 1500 जवानांनी बलिदान दिले आहे.
निमलष्करी जवानाला लागलेली गोळी वेगळी कशी? मरणा-या निमलष्करी जवानाच्या यातना लष्कराच्या शहीद जवानापेक्षा वेगळ्या कशा? की दोघांच्या देशभक्तीसाठी वेगवेगळे मापदंड आहेत? तर मग निमलष्करी जवानाचा मृत्यू केवळ मृत्यू व लष्कराच्या जवानाला मात्र शहीद का म्हटले जाते? असे प्रश्न सीआरपीएफचे निवृत्त कमांडंट आर.बी. पाठक विचारतात.
सीआरपीएफचे निवृत्त आयजी सुरेश शर्मा यांच्या मते देशाच्या शत्रूविरुद्ध लढताना बलिदान देणा-यांना एकसारखाच सन्मान देण्यात आला पाहिजे. सैनिक कल्याण मंडळाच्या धर्तीवर निमलष्करी दलासाठी कल्याण व पुनर्वसन मंडळ केवळ कागदोपत्री कार्यरत आहे. डिफेन्स सर्व्हिसमध्ये वरिष्ठ अधिकारीही त्याच सेवेतील असतात, तर निमलष्करी दलातील बहुतांश वरिष्ठ अधिकारी आयपीएस आहेत. त्यांना दलाशी काहीही घेणे-देणे असत नाही.
लष्कराचे अजब तर्क
भावनिक होऊन शहिदांचा दर्जा नको
लष्कर आणि निमलष्करी दलाला समान दर्जा दिला तर लष्कराची गरजच नाही. आम्ही प्रत्येकालाच शहीद म्हणणार असू तर हौतात्म्याचे महत्त्वच उरणार नाही. कर्तव्यावर मरणा-या प्रत्येकालाच परमवीर चक्र दिले जात नाही. आमच्या संसदेवर हल्ला झाला आणि या हल्ल्यात मारल्या गेलेल्या सीआरपीएफ जवानांना भावनेच्या आहारी जाऊन अशोकचक्र देण्यात आले. लष्करामध्ये अनेक शत्रूंना कंठस्नान घालणा-या जवानाला अशोकचक्र देण्यात येते. न मारताच गोळी लागून मरण्यात शौर्य कसले?
जनरल व्ही.के. सिंह, माजी लष्करप्रमुख
निमलष्करी दलापुढे आव्हाने कमीच
निमलष्करी दलाची लढाईतील भूमिका लष्करापेक्षा कमीच आहे. निवडणुकीत तैनात करण्यासाठी निमलष्करी दल स्थापन करण्यात आले आहे. त्यांना आजकाल दहशतवादग्रस्त भागात पूरक दल म्हणून तैनात करण्यात येऊ लागले आहे. मात्र त्यांच्याकडे त्यांच्याशी सामना करण्यासाठी ना शस्त्रे आहेत ना प्रशिक्षण. लष्कराच्या शहीद जवानाला मिळणा-या मदतीचा वाटा निमलष्करी दलाला देण्यात आला तर तो लष्करावर अन्यायकारक ठरेल.
मेजर जनरल जी. डी. बक्षी,
माजी लष्करी अधिकारी
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.