आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनमाेहन सिंग यांची माेदींना शिकवणी!, राहुल गांधींचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कार्यकर्ते जोडण्यासाठी एनएसयूआयचे मोबाइल अॅप तयार करण्यात आले. ते पाहताना राहुल गांधी व एनएसयूआयचे अध्यक्ष रोजी जॉन. - Divya Marathi
कार्यकर्ते जोडण्यासाठी एनएसयूआयचे मोबाइल अॅप तयार करण्यात आले. ते पाहताना राहुल गांधी व एनएसयूआयचे अध्यक्ष रोजी जॉन.
नवी दिल्ली - काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार हल्लाबोल केला. ‘अर्थव्यवस्था घसरणीच्या दिशेने जात आहे, असे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले व पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना बोलावले. त्यांच्या एक तासाच्या शिकवणीमुळे अर्थव्यवस्था कशी चालते हे मोदींना समजले,’अशी खोचक टिप्पणी राहुल यांनी केली. मोदींच्या निमंत्रणावरून सिंग त्यांना भेटण्यास गेले होते. त्यावरून त्यांनी राहुल यांच्यावर निशाणा साधला.

संघ शिस्त हा विचारांचा खून
एनएसयूआयच्या अधिवेशनात राहुल यांनी बोलण्यास सुरुवात करताच घोषणाबाजी सुरू झाली. त्यांनी त्याची तुलना रा. स्व. संघाच्या शिस्तीशी केली. ते म्हणाले, ‘मला संघाची शिस्त समजण्यासाठी १० वर्षे लागली. शिस्त आमच्या डीएनएमध्येच आहे. लहान कार्यकर्तही आपले म्हणणे मांडू शकतो. काँग्रेसची हीच ताकद आहे. दुसरीकडे संघाकडे पाहा. शाखेत सरळ रेषा असते. एखाद्या स्वयंसेवकाने शिस्त मोडली की त्याच्यावर लाठी पडते. शिस्त म्हणजे विचारांची हत्या करण्याचा बहाणा आहे. विचारांची हत्या आणि अंतर्गत लोकशाही चिरडणे ही संघाची विचारधारा आहे.’

पंतप्रधान मोदी- माजी पंतप्रधान सिंग यांच्या भेटीच्या निमित्ताने शरसंधान
संघ विचारांचा परिणाम म्हणजे मोदी देशात अंतर्गत विचारविनिमय बंद करू पहात आहेत, असे सांगून राहुल म्हणाले, भाजपत एकाच व्यक्तीला (मोदी) सर्व काही माहिती आहे. शेतकरी, शिक्षण एवढेच नव्हे, तर कपड्यांबाबत बोलायचे असेल तरीही एकाच व्यक्तीला त्याची माहिती आहे. याच विचारांवर आज देशाची वाटचाल सुरू आहे. दुसरीकडे काँग्रेसमध्ये विचारभिन्नता असलेले लोक एकत्र येऊन निर्णय घेतात; पण भाजपत सर्वांना चूप राहण्यास सांगितले जाते. एवढेच काय, पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणीही चूप बसतात.

मोदींचे विदेशात दौऱ्यांवर दौरे, शेतकऱ्यांच्या घरी भेटही नाही
राहुल म्हणाले, मोदी विदेशात फिरत आहेत. अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, चीन एवढेच काय मंगोलियालाही गेले. पण देशातील एखाद्या शेतकरी अथवा मजुराच्या घरी गेले नाहीत. सत्तेत आल्यानंतर १०० दिवसांत काळा पैसा परत आणण्याची घोषणा त्यांनी केली होती. एक वर्ष झाले तरी पण काहीही घडले नाही. हे सरकार चुकांवर चुका करत आहे. काँग्रेससाठी ही संधी आहे. सामान्य माणूस सशक्त होत नसल्याने मेक इन इंडियाचा परिणाम शून्य असेल.

संघाचे विचार माथी मारणे हा शैक्षणिक सुधारणांचा मूळ हेतू
राहुल म्हणाले, पंतप्रधान शिक्षणात सुधारण्याच्या गोष्टी करतात. मोदींचे शैक्षणिक धोरण संघाच्या हाती आहे. त्यांची विचारसरणी लादली जात आहे. संघाच्या लोकांना शिक्षण मंत्रालयात आणले जात आहे. शिक्षणात सुधारणा करण्यासाठी काही लोक आपली मते देण्यासाठी उत्सुक असायचे, तेच आता फक्त एकच विचारसरणी थोपली जात आहे, असे म्हणून आता पदे सोडून जात आहेत. आम्हाला प्रत्येक स्तरावर त्याचा विरोध करावा लागेल.

भाजपचे प्रत्युत्तर : राहुल सादर करत होते आयटम नंबर
भाजपचे प्रवक्ते जी. व्ही. एल. नरसिंह राव म्हणाले, ‘काँग्रेसमध्ये एकाच कुटुंबांची चलती आहे. संपूर्ण पक्ष याच कुटुंबाच्या भोवती फिरतो. त्यामुळे राहुल गांधी भाजप व संघावर अंतर्गत लोकशाहीचा गळा घोटण्याचा आरोप करत असतील तर तो हास्यास्पद ठरेल. काँग्रेसमध्ये तर माजी पंतप्रधानांनाही (मनमोहन) बोलण्याचे स्वातंत्र्य नाही. राहुल आपल्या युवा कार्यकर्त्यांसमोर आयटम नंबर सादर करत होते. आपल्या वक्तव्यांद्वारे ते त्यांचे मनोरंजन करत होते.