नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीवरुन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी आणि एनडीएवर टीका केली आहे. मोदी आणि एनडीएच्या धोरणामुळे काश्मिर जळत असल्याची जळजळीत टीका त्यांनी केली आहे. राहुल गांधी म्हणाले, 'काश्मिर हा आमचा देशांतर्गत प्रश्न आहे. याच्याशी दुसऱ्या कोणत्याही देशाला काही देणे-घेणे नाही.'
काश्मिर भारत आहे, भारत काश्मिर आहे
- संसद परिसरात माध्यमांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले, काश्मिरवर चीन आणि पाकिस्तानसोबत चर्चेवर एकच सांगता येईल की काश्मिर भारत आहे आणि भारत काश्मिर आहे.
- राहुल गांधी म्हणाले, मी आधीपासून सांगत आहे की मोदी आणि एनडीएच्या धोरणांमुळे काश्मिर धगधगत आहे.
मित्र राष्ट्रांचा चर्चेसाठी उपयोग करा - फारुख अब्दुल्ला
- काश्मिर समस्येवर चर्चा करण्यासाठी पाकिस्तान एक पक्ष आणि त्यांच्यासोबत चर्चा करुन या समस्येवर तोडगा काढता येऊ शकतो. त्यासोबतच तिसऱ्या पक्षालाही यात सोबत घेतले पाहिजे, असे जम्मू-काश्मिरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. शुक्रवारी माध्यमांशी बोलताना अब्दुल्ला यांनी काश्मिर समस्येवर तोडगा काढण्यासाठी मित्र राष्ट्रांची मदत घेण्याचा पर्याय दिला आहे.
-ते म्हणाले, 'ट्रम्प यांनी स्वतःहून म्हटले आहे की काश्मिर समस्येवर तोडगा निघाला पाहिजे. यासाठी आम्ही त्यांना काहीही म्हटलेले नव्हते. चीननेही काश्मीरवर मध्यस्ती करण्याची इच्छा व्यक्त केली होती.'