नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीतील आठवा टप्पा आज पार पडत आहे. यात 7 राज्यातील 64 जागांवर मतदान सुरु आहे. जम्मू-कश्मीरमधील बारामूल्ला लोकसभा मतदारसंघातील एका मतदानकेंद्राजवळ आयईडीचा स्फोट झाल्याचे वृत्त आहे. 64 मतदारसंघात सुमारे 900 उमेदवार मैदानात आहेत. मतदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 असली तरी नक्षली भागात मतदान 4 लाच संपेल.
आज अमेठीत मतदान होत आहे. मतदानाच्या दिवशी भल्या पहाटे राहुल गांधी आपल्या मतदारसंघात दाखल झाले. यावेळी त्यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. आज सकाळी माध्यमांशी बोलताना राहुल म्हणाले, कोणतीही जात नीच नसते. नीच असतो तो विचार आणि कर्म. मोदी यांनी काल म्हटले होते की, मी नीच जातीचा असल्यामुळेच माझी तुलना नीच राजकारणाशी केली जाते. दुसरीकडे, अमेठीतील आम आदमी पक्षाचे उमेदवार कुमार विश्वास यांनी म्हटले आहे की, अमेठीत तर झाडू चालला आहे. मी गेल्या चार महिन्यापासून येथील गावागावात आणि गल्लीगल्लीत गेलो आहे. आम्ही पहिल्यापासूनच सांगत आलो आहे की, आम्ही राजकारणात जिंकण्यासाठी आलो नाही तर राजकारण बदलविण्यासाठी आलो आहे. मला वाटते आम्ही त्यात यशस्वी झालो आहे.