आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi Blames On Government On Internet Neutrality Issue

जमिनीप्रमाणेच इंटरनेटही कॉर्पोरेट्सना देण्याचा घाट, राहुल गांधींचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नेट न्यूट्रॅलिटीच्या मुद्द्यावर सरकारवर निशाणा साधत विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सरकार इंटरनेट कॉर्पोरेट्सना देऊ इच्छित असल्याचे म्हटले आहे. सरकारने मात्र राहुल यांचे आरोप फेटाळले असून इंटरनेट सर्वांचे आहे आणि सरकार याबाबत लवकरच अंतिम निर्णय घेईल, असे स्पष्ट केले आहे.

राहुल यांनी बुधवारी शून्य प्रहरात म्हटले की, मोदी सरकार ज्याप्रमाणे शेतक-यांची जमीन हिसकावून घेत आहे, त्याचप्रमाणे इंटरनेटही काही उद्योगपती आणि कॉर्पोरेट्सना देऊ इच्छित आहे. सध्याच्या इंटरनेट कायद्यात बदल हवा की नवा कायदा असावा, या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, इंटरनेट युजर्स आणि तरुणांनी मोदींना पाठिंबा दिला होता, त्यामुळे ते त्यांच्या हक्कांचे रक्षण करतील. मात्र, आता त्याचे उलटे घडत आहे. उद्योगपती, कॉर्पोरेट्सना देण्यासाठी जमिनीप्रमाणे त्यांचे इंटरनेटही हिसकावून घेतले जात आहे. राहुल म्हणाले, मी एक प्रश्न विचारू इच्छितो. तुम्ही (सरकार) न्यूट्रॅलिटीच्या बाजूने असाल तर तुम्ही त्यास ट्रायशी जोडून विचार विनिमय का सुरू केला आहे. हे एका फुग्याच्या चाचणीसारखे आहे. पहिल्यांदा फुगा फोडा, त्यानंतर ही प्रक्रिया पाहा. यासंदर्भात तीव्र प्रतिक्रिया आल्यास पुढे जाऊ नका.

दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी राहुल यांचे आरोप फेटाळले आहेत. इंटरनेट सर्वांचे असून ते सर्वांचेच राहिले पाहिजे, असे ते म्हणाले. पंतप्रधानांच्या डिजिटल कार्यक्रमांतर्गत याची आखणी केली जात आहे. मोदी सरकार कोणत्याही कॉर्पोरेटच्या दबावाखाली येत नाही आणि येणारही नाही. प्रसाद म्हणाले, हा मुद्दा उपस्थित करण्याआधी जानेवारीमध्ये एका समितीची स्थापना केली होती. ही समिती विविध पैलूंचा विचार करणार आहे. ट्राय यासंदर्भात विचार करू शकते. मात्र, अंतिम निर्णय मला आणि माझ्या सरकारला घ्यावयाचा आहे. संसदीय कामकाजमंत्री एम. व्यंकय्या नायडू म्हणाले, कोणताही मुद्दा उपस्थित करण्याचा सदस्याचा अधिकार आहे.

नॅसकॉमकडून नेट न्यूट्रॅलिटीचे समर्थन
सॉफ्टवेअर क्षेत्रातील कंपन्यांची प्रमुख संघटना नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस कंपनीजने (नॅसकॉम) नेट न्यूट्रॅलिटीचे समर्थन केले आहे. नॅसकॉमच्या म्हणण्यानुसार, यावर नियंत्रण आणण्याचा कोणताही प्रयत्न अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि माहिती अधिकाराचे उल्लंघन ठरेल. नॅसकॉमचे अध्यक्ष आर. चंद्रशेखर म्हणाले, आपल्या संघटनेने यासंदर्भातील शिफारशी ट्रायला दिल्या आहेत.

वादग्रस्त वक्तव्यावर नितीन गडकरींचे घुमजाव!
‘शेतक-यांनी देवावर अाणि सरकारवर विश्वास ठेवू नये’ असे वक्तव्य केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी अमरावतीमध्ये केले हाेते. परंतु त्या वक्तव्याचे राजकारण झाल्याने त्यांनी बुधवारी लाेकसभेत शब्दचमत्कृतीने घूमजाव केले. त्यामुळे अखेर वादावर पडदा पडला. १० एप्रिल राेजी अमरावती येथील कृषी प्रदर्शनीमध्ये गडकरी यांनी वरील विधान केले हाेते. त्यानंतर गडकरींच्या विराेधात विराेधकांच्या प्रतिक्रिया उमटल्यात. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी साेमवारी लाेकसभेत पिकाचे नुकसान आणि शेतक-यांची दयनीय अवस्था यावर बाेलताना नितीन गडकरी यांचे वक्तव्य म्हणजे माेदींच्या मन की बात असल्याची टीका केली हाेती . दरम्यान, नितीन गडकरी यांची पत्नी कांचन, मुलगी केतकी, स्नुषा मधुरा व ऋजुता या लाेकसभा अध्यक्षांच्या गॅलरीत राहून त्यांनी काही काळ कामकाज पाहिले.