नवी दिल्ली - पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या नऊ मे च्या आगामी दंतेवाडा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने उपाध्यक्ष राहुल गांधींना दंतेवाडात घेऊन जाण्याची तयारी चालवली आहे. छत्तीसगडचे प्रदेशाध्यक्ष भूपेश बघेला व विरोधी पक्षनेता टी. एस. सिंहदेव यांनी दौऱ्याचे संकेत देत त्याची तयारी सुरू केली आहे. या महिनाअखेरीस २५ - २६ मे रोजी राहुल गांधी दंतेवाडासह राज्यातील अन्य नक्षलप्रभावित भागात पदयात्रा काढणार असून या भागात त्यांच्या सभाही होण्याची शक्यता आहे.
मोदींच्या िवदेश दौऱ्याला उत्तर म्हणून राहुल गांधी पदयात्रेच्या माध्यमातून देशाच्या विविध राज्यांत दौरे करत आहेत. नक्षलग्रस्त छत्तीसगडचा दौरा हा त्याचाच भाग आहे. राहुल यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम एक - दोन दिवसांत निश्चित होणार आहे. त्यासाठी पक्षाचे कोशाध्यक्ष मोतीलाल व्होरा, राज्य प्रभारी बी. के. हरिप्रसाद प्रयत्नशील आहेत. मोदींच्या दंतेवाडा दौऱ्याला प्रत्युत्तर म्हणून राहुल यांची पदयात्रा यशस्वी व्हावी असा काँग्रेसचा प्रयत्न आहे. याच काळात मोदी सरकारला वर्ष पूर्ण होत असल्याने भूसंपादन, मनरेगा, नक्षलवाद, आदी मुद्यांवर राहुल मोदींवर हल्लाबोल करू शकतात.
सुरक्षेमुळे बस्तरमध्ये पदयात्रा होणार नाही : सुरक्षेच्या कारणास्तव राहुल गांधी बस्तर येथे पदयात्रा काढणार नाहीत; परंतु या ठिकाणी त्यांची सभा आयोजित केली जाण्याची शक्यता आहे. सभेला वा पदयात्रेला परवानगी नाकारली तरीही त्यावरून सरकारला टीकेचे लक्ष्य करण्याची काँग्रेसची योजना आहे.