आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rahul Says In Us Dynastic Politics Is Problem In India Like Abhishek Bachchan Akhilesh Ambanis

अहंकारामुळे काँग्रेस पक्ष 2014 मध्ये पराभूत झाला; राहुल गांधींचा अमेरिकेत विद्यार्थ्यांशी संवाद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅलिफोर्निया विद्यापीठात \'सत्तरीतील स्वतंत्र भारत: आगामी वाटचाल\' या विषयावर राहुल गांधी बोलत होते. - Divya Marathi
कॅलिफोर्निया विद्यापीठात \'सत्तरीतील स्वतंत्र भारत: आगामी वाटचाल\' या विषयावर राहुल गांधी बोलत होते.
नवी दिल्ली/वॉशिंग्टन - अमेरिका दौऱ्यावर असलेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी कॅलिफोर्नियातील बर्कले विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या वेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी मोकळेपणाने उत्तरे दिली. एका प्रश्नावर ते म्हणाले, ‘सन २०१२ मध्ये पक्षात अहंकार माजला होता. पक्ष लोकांपासून दूर गेला होता. १० वर्षे सलग सत्तेत राहिल्यानंतर असे होते. याचा परिणाम म्हणजे २०१४ मध्ये काँग्रेस पक्ष पराभूत झाला.’ घराणेशाहीवरही त्यांनी भाष्य केले. भारतात वारसा हक्काने खूप काही गोष्टी चालतात, असे सांगून आता पक्षात पुनर्बांधणीची गरज असल्याचेही राहुल यांनी नमूद केले.

घराणेशाहीचे राजकारण एक समस्याच
भारतात घराणेशाही एक राजकीय समस्या असल्याचे सांगून अखिलेश असोत वा स्टॅलिन, अभिषेक बच्चन असो किंवा अंबानी, अनेक प्रसिद्ध भारतीय कुटुंबात ही घराणेशाही आहे, असे राहुल म्हणाले. भारतात वारसा हक्काने खूप काही चालते. मात्र, या लोकांत क्षमता आहे की नाही हा मुख्य प्रश्न असतो, असेही ते म्हणाले.
 
पीएम उमेदवारीबाबत पक्षपातळीवर निर्णय
पंतप्रधानपदाचा उमेदवार होण्यास आपण तयार असल्याचेही राहुल यांनी सांगितले. एका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवण्याची पक्षात एक निश्चित अशी प्रक्रिया आहे. त्यामुळे याबाबतचा निर्णय पक्षपातळीवर ज्येष्ठ नेते एकत्रितपणे घेतील.
 
नोटाबंदीचा निर्णय अविचारातून घेतला
नोटाबंदीसारखा निर्णय वित्तीय सल्लागार आणि खासदारांना विश्वासात न घेता घेतला गेला. यामुळे देशाचे खूप नुकसान झाले. छोटे व मध्यम व्यापारी हेच भारतीय अर्थव्यवस्थेचा आधार आहेत. भारताला चीनच्या वाटेवर न चालता रोजगाराच्या संधी द्याव्या लागतील, असेही राहुल म्हणाले.
 
राहुल यांनी मान वाढवला - आनंद शर्मा
राहुल यांनी अपयश मान्य करून सत्तारूढ पक्षाच्या चुकाही दाखवून दिल्या. यातून परदेशात त्यांनी देशाचा मानच वाढवला. मोदींनी पहिल्याच विदेशवारीत भारताची प्रतिमा एक भ्रष्ट देश अशी असल्याचे वक्तव्य करून देशाचा अपमान केला होता, असे काँग्रेस नेते आनंद शर्मा म्हणाले. 
 
इराणींची टीका
पंतप्रधान मोदींवरील टीका नवी नाही. मात्र, जागतिक स्तरावर आपल्याच देशाची बदनामी करणे म्हणजे समस्त भारतीयांचा अपमान आहे, असे माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटले आहे.
 
 
भाषणात केली चूक, सोशल मीडियावर मस्करी
एका प्रश्नाच्या उत्तरात राहुल यांच्याकडून एक चूक झाली. लोकसभेतील सदस्य संख्या ५४५ ऐवजी ५४६ असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर लगेच ट्विटरवर चर्चा झडली. एकाने पोस्ट केले, ‘राहुल गांधी सायंकाळपर्यंत एकही चूक करणार नाहीत, असे होतच नाही. मी त्यांच्याकडून फारच अपेक्षा ठेवल्या होत्या.’ दुसऱ्याने पोस्ट केले, ‘एखाद्या सभागृहात सदस्यांची संख्या इव्हन (सम) अशी असू शकते.’
 
सॅम पित्रोदांनी केले स्वागत
- सॅनफ्रान्सिस्को विमानतळावर ज्येष्ठ काँग्रेस नेते सॅम पित्रोदा आणि काँग्रेसच्या अमेरिकी युनिटचे अध्यक्ष शुधसिंग यांनी राहुल यांचे स्वागत केले. 
- 1949 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरुंची बर्कले कॅलिफोर्निया विद्यापीठात भाषण केले होते. 
- येथील भारतीय समुदायासोबत राहुल गांधी संवाद साधणार आहेत. अस्पेन विद्यापीठातील विचारवंतांशीही ते चर्चा करणार आहेत. 
बातम्या आणखी आहेत...